नव्या कल्याण परिसरात जाण्यासाठी रिक्षाचालक रेल्वे स्थानकापासून वाढीव भाडे आकारू लागल्याने सर्वसामान्य प्रवासी हैराण झाले आहेत. टिळक चौक, बाजारपेठ, मुरबाड रोड, संतोषी माता रोड या जवळच्या भागात जायचे असेल तर कमी भाडे मिळते. त्यामुळे रिक्षाचालक नजीकच्या ठिकाणी जाण्यासाठी वाढीव भाडे सांगून प्रवाशांना टाळू लागले आहेत. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ खडकपाडा, लालचौकी येथे जाण्यासाठी शेअर रिक्षाच्या तीन रांगा लागलेल्या असतात. नवखा प्रवासी या रिक्षात बसून टिळक चौक, बाजारपेठ, बाजार समिती, पत्रीपूल भागात जाण्यासाठी प्रयत्न करीत असेल तर त्याला चालकाकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही.  प्रवासी मुख्य रस्त्यावरील अनधिकृत वाहनतळावर गेला की रिक्षाचालक त्याला टिळक चौक, अत्रे रंगमंदिर भागात जायचे असेल तर एकेरी भाडय़ाचे ४० ते ५० रुपये सांगतो.  एखादा गरजू प्रवासी नाइलाजाने जवळच्या प्रवासासाठी वाढीव पैसे मोजून प्रवास करतो. चालकांच्या या मग्रुरीविषयी रिक्षा संघटना, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नाही.