पनवेलमधील बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांना परिवहन विभागाच्या सहकार्यामुळे आता यश मिळू लागले आहे. प्रवाशांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या चालकांना चाप लावण्यासाठी परिवहन विभागाने गेल्या आठ दिवसांत अडीच रिक्षाचालकांची कसून तपासणी केली असून त्यातील ८४ रिक्षाचालकांवर कारवाई करत २७ रिक्षा जप्त केल्या आहेत.
सध्या पनवेलच्या एसटी स्टॅण्ड व पनवेल रेल्वे स्थानकासमोरील तीन आसनी रिक्षांना मीटरप्रमाणे चालण्यासाठी परिवहन विभागाने सक्ती केली आहे. येथे सकाळी व सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवाशांना मीटर डाऊन करून प्रवासाला सुरुवात करून दिली जाते. सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत व सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत येथे अधिकारी प्रवाशांना रिक्षांचा मीटर डाऊन करून प्रवासाचा शुभारंभ करतात. या कारवाईच्या भीतीने स्टॅण्ड व रेल्वे स्थानकाशेजारील रिक्षास्टॅण्डवर व्यवसाय करणारे रिक्षाचालक ठरावीक वेळेत या मार्गाकडे येणे टाळत आहेत. ज्या प्रवाशांना शेअर भाडय़ाचा प्रवास करायचा आहे अशांसाठी शेअर वाहतूक करणारी वेगळी रांग रेल्वे स्थानकाजवळ लावण्याची सोय अधिकाऱ्यांनी केली आहे. रिक्षाचालकांची बैठक घेऊन त्यांच्या संमतीने मीटर डाऊन करण्याचा उपक्रम परिवहन विभागाने हाती घेतला आहे. मीटरप्रमाणे रिक्षांमधील प्रवास व्हावा हा सामाजिक प्रश्न घेऊन जनजागृती ग्राहक मंचाने परिवहन विभागासमोर मांडल्यानंतर परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या आदेशानंतर या प्रभावी कारवाईला सुरुवात झाली आहे. या कारवाईमध्ये परिवहन विभागातील अधिकारीवगळता वाहतूक पोलिसांचा अल्प समावेश जाणवतो, त्यामुळे हा सामाजिक प्रश्न सोडविण्याची कायदेशीर जबाबदारी परिवहन विभागाची असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. मानसरोवर व खांदेश्वर रेल्वे स्थानकाबाहेरून प्रवाशांची वाहतूक शेअर पद्धतीने केली जाते. मात्र येथून पेट्रोलच्या भाडेदरात सीएनजी गॅसवर चालणाऱ्या रिक्षा तीनऐवजी पाच प्रवासी घेऊन प्रवास करतात. सिडको वसाहती व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रिक्षाचालकांच्या विरोधामुळे या पल्ल्यांवर बससेवा सुरू होऊ शकल्या नाहीत येथून बससेवा सुरू करण्यासाठी परिवहन विभागाने एसटी, बीएसटी, केडीएमटी, एनएमएमटी व पनवेल नगर परिषदेच्या परिवहन विभागाला लेखी पत्र दिल्याचे या विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच लवकरच संबंधित बससेवा सुरू करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू होईल.

प्रवाशांना आवाहन
रिक्षा मीटरप्रमाणे न चालवणे, उद्धट वर्तन, जादा भाडे आकारणे, भाडे नाकारणे यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या शहर शाखेने १०० किंवा ०२२२७४५१५९१ किंवा मोबाइल क्रमांक ७७३८३९३८३९ किंवा जवळच्या वाहतूक चौकीत तक्रार करावी. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त (वाहतूक) कार्यालय, नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखा, कोकण भवन, दुसरा मजला, सीबीडी बेलापूर या पत्तावर लेखी तक्रारदेखील करता येईल.

परिवहन विभाग (प्रादेशिक अधिकारी यांचे कार्यालय)
०२२२७४२४४४४, ०२२२७४२५५५५ एसएमएस करून तक्रार करण्यासाठीचा क्रमांक ९००४६७०१४६
(एसएमएस आणि ई-मेलवर तक्रार करण्यासाठी नाव, पत्ता, तारीख, वेळ, रिक्षा क्रमांक, तक्रारीचे स्वरूप असे लिहावे.)

पनवेलमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा सुरूकेल्यामुळे परिवहन अधिकाऱ्यांना धन्यवाद. मात्र ही कारवाई काही दिवसांची न ठेवता सातत्याने केल्यास ती प्रवाशांच्या सोयीची ठरेल. – पूनम जोग, प्रवासी.