राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांसह प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे निर्देश देतानाच कसारा रेल्वे स्थानक, इगतपुरी, घोटी, ओझर, पिंपळगाव, चांदवड येथील अधिकृत बस स्थानकांवरूनच प्रवाशांची चढ-उतार करण्यात येईल अशी माहिती विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी आपणांस दिल्याचे जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड यांनी कळविले आहे.
जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गांवांमधील अधिकृत बस स्थानक तसेच मुंबई, ठाणे या मार्गावर प्रवाशांची चढ-उतार निमआराम बसेस वगळून सर्व अतिजलद, साध्या बसेसच्या वाहक आणि चालकांनी करावी तसेच प्रवाशांसह विद्यार्थ्यांना सौजन्याची वागणूक देण्यासंदर्भात बुरड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
या संदर्भात विभाग नियंत्रक जोशी यांनी बुरड यांना सदरची मागणी मान्य करण्यात आल्याचे कळविले आहे. त्यानुसार बाजारपेठ म्हणून प्रसिध्द असलेल्या गावांमधील बस स्थानकात प्रवाशांची चढ-उतार करण्यासंदर्भात चालक, वाहक तसेच आगार प्रमुखांना लेखी आदेश देण्यात आल्याचे म्हटले आहे.
ग्रामीण भागातील सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन बुरड यांनी निवेदनाव्दारे केले आहे.