पोलीस ठाण्यातील हद्द कोणाची, हा वाद तसा तक्रारदारांना नवा नाही. या वादात आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच महापालिकेच्या रुग्णालयांचीदेखील भर पडल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची परवड सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. डोंबिवली शहराचा एक भाग असलेल्या आजदे गावात गेल्या आठवडय़ापासून एक तरुणी डेंग्यूने आजारी आहे. या तरुणीला रुग्णालयातील हद्दीच्या वादाचा मोठा फटका बसल्याचे पुढे येत आहे. या तरुणीवर एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजदे गावातील बुधाजी पाटील चाळीतील एक तरुणी गेल्या आठवडय़ापासून आजारी होती. तिच्या शरीराच्या एका बाजूला अचानक सूज यायची. कधी अशक्तपणा असायचा. ही लक्षणे विचित्र वाटत असल्याने या मुलीच्या संपर्कात असलेल्या माधवी सरखोत यांनी तिला तात्काळ डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला. आजदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही तरुणी उपचार घेण्यासाठी अनेक वेळा गेली. त्या वेळी तेथील काही परिचारिकांनी तिला डॉक्टर बैठकीला गेले आहेत, डॉक्टर बाहेर आहेत, अशी उत्तरे दिली. ही तरुणी उपचारासाठी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात गेली असता तेथे किरकोळ तपासणी करून तिला तुम्ही उद्या तपासणीसाठी या, असे सांगण्यात आले. या काळात तरुणीचा आजार बळावला. माधवी सरखोत यांनी तिला एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात दाखल केले. तिच्या चाचण्या घेतल्यानंतर तिला डेंग्यू असल्याचे वैद्यकीय चाचण्यांमध्ये स्पष्ट झाले. या काळात संबंधित तरुणीवर आठवडाभर सरकारी किंवा पालिका रुग्णालयातून उपचार लझाले नसल्याची खंत सरखोत यांनी व्यक्त केली. आजदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गावात डेंग्यू रुग्ण सापडल्याची माहिती देण्यात आली. तरीही आठवडभर आरोग्य केंद्रातील साधा कर्मचारी एम्स रुग्णालयाकडे फिरकला नसल्याचे सरखोत यांनी सांगितले. गावातील कचरा नियमित उचलला जात नाही. त्यामुळे या भागात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. महापालिकेकडे धूरफवारणी व अन्य सामग्री देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र तुमचा परिसरमहापालिका हद्दीत येत नसल्याचे कारण पालिकेकडून ग्रामपंचायतीला देण्यात आले असल्याचे बोलले जाते. आजदेच्या सरपंच नीलम मोरे यांनी ‘आजदे गाव, एमआयडीसी भागात नियमित स्वच्छता केली जाते’, असे सांगितले. ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचरा उचलण्यात येतो. रस्त्यावरील खड्डे, तुंबलेले पाणी या ठिकाणी जंतुनाशके नियमित टाकली जातात. आरोग्य केंद्रात नियमित डॉक्टर असतात. तालुका, जिल्हा ठिकाणी बैठका सतत होत असल्याने त्यांना तेथे जावे लागते. गावात डेंग्यूचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य केंद्राचे डॉ. बाबूराव जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून सतत संपर्क केला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी सोनावणे यांनीही प्रतिसाद दिला नाही.