नऊ वर्षांच्या बालिकेच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या तिच्या आप्तेष्टांनी रुग्णालयात तोडफोड केली. जमावाला पोलिसांनी काठय़ांचा प्रसाद देऊन पांगविले. भंडारा मार्गावरील पारडीमध्ये बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
हर्षिता केशव बोरकर (रा. पारडी) असे मरण पावलेल्या बालिकेचे नाव आहे. सोमवारी पोटात दुखू लागल्याने तिला पारडी गंगाबागमधील एडीएन रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी साडेआठ वाजता तिचा मृत्यू झाला. हे समजल्यानंतर तिच्या आप्तेष्टांनी रुग्णालयात धाव घेतली. तिच्या आकस्मिक मृत्यूने जमाव संतप्त झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने तिचा मृत्यू झाल्याच्या शंकेने संतप्त जमावाने आधी रुग्णालयासमोर उभ्या रुग्णवाहिकेवर दगडफेक करून तिच्या काचा फोडल्या. त्यानंतर जमाव रुग्णालयात शिरला आणि आतील सामान, टेबल, खुच्र्याची फेकाफेक केली. कपाटे उलथवून टाकली. आतील दारे व खिडक्यांची तावदाने फोडून टाकली. रुग्णवाहिकेची तोडफोड पाहून रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना कळविले. हे समजल्यानंतर कळमना पोलीस तातडीने तेथे पोहोचले. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी काठय़ांनी प्रसाद दिला. तेव्हाच जमाव पांगला.
पोलिसांनी बालिकेच्या पालकांची विचारपूस केली. हर्षिताचे वडील इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंग ठोकण्याची कामे करतात. काल तिचे पोट दुखू लागल्याने आणि अंगात ताप असल्याने तिला या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला सलाईन लावून इंजेक्शन देण्यात आले. रक्त तपासणीसाठी तीन हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. त्यांनी अडीच हजार रुपये जमा केले. त्यानंतर तिची तब्येत बरी असल्याचे तेथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. आज सकाळी तिची कुठलीच हालचाल होत नव्हती. सकाळी सात वाजताच्या सुमारास तिची आई कांचनने डॉक्टरांना ही बाब सांगितली. तरीही डॉक्टरांनी हर्षिताकडे लक्षच दिले नाही, तब्येत गंभीर असल्याचे स्पष्ट दिसत असूनही तिला शासकीय रुग्णालयात नेऊ दिले नाही.
डॉक्टरांच्या निष्काळजीपणानेच हर्षिताचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. जिल्हा शल्य चिकित्सकांना याप्रकरणी पत्राद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.