रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी औषधोपचाराबरोबर पोषक आहाराचीही नितांत गरज असते. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणाऱ्या आहारतज्ज्ञांची पालिका रुग्णांमध्ये वानवा आहे. पालिकेच्या मोठय़ा रुग्णालयांमधील खाटांची संख्या लक्षात घेता तेथे उपलब्ध आहारतज्ज्ञांची संख्या तुटपुंजी आहे. तर छोटय़ा रुग्णालयांमध्ये आहारतज्ज्ञांची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. आहारतज्ज्ञांच्या असंतुलित संख्येमुळे रुग्णांना उपचारादरम्यान ताटात पडेल तो आहार घ्यावा लागत आहे. परिणामी आहारतज्ज्ञांच्या नियुक्तीसाठी एक ठोस धोरण निश्चित करण्याची वेळ आली आहे.
नायर रुग्णालय (१,२२९ खाटा), केईएम रुग्णालय (२,२८८ खाटा) आणि लोकमान्य टिळक रुग्णालय (१,४२२ खाटा) ही महापालिकेची सर्वात मोठी तीन रुग्णालये असून या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी ४,९३९ खाटा उपलब्ध आहेत. पालिकेची एकूण १,९३५ खाटांची क्षमता असलेली पाच विशेष रुग्णालये आहेत. तर पालिकेशी संलग्न असलेल्या ठिकठिकाणच्या छोटय़ा-मोठय़ा पेरिफेरिअल रुग्णालयांमध्ये एकूण ४,५८९ खाटांची व्यवस्था आहे. नाममात्र दरामध्ये उपचार देणारी ही पालिकेची रुग्णालये रुग्णांसाठी वरदान ठरू शकतात. पालिकेच्या मोठय़ा तीन रुग्णालयांमध्ये दरदिवशी येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. या रुग्णालयांमध्ये निरनिराळ्या व्याधींनी त्रस्त झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे सर्वच रुग्णांना सरसकट एकाच पद्धतीचा आहार देणे योग्य ठरत नाही. रुग्णांचा आहार ठरविण्यासाठी पालिकेने या रुग्णालयांमध्ये आहारतज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. मात्र रुग्णसंख्येच्या तुलनेत ती फारच कमी आहे. परिणामी नियुक्त आहारतज्ज्ञांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. या ताणाचा फटका रुग्णांनाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विशेष रुग्णालयांमध्ये आहारतज्ज्ञ आहे, तर काही ठिकाणी नाहीत. तर बहुतांश पेरिफेरिअल रुग्णालयांमध्ये आहारतज्ज्ञांची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या आस्थापनेवर २ आहारतज्ज्ञ आणि ४ कनिष्ठ आहारतज्ज्ञांची अशी पदे आहेत. परंतु रुग्णालयांतील खाटांची संख्या लक्षात घेता आहारतज्ज्ञांची ही संख्या अपुरी आहे.
पालिका रुग्णालयांमध्ये गरीब अथवा मध्यमवर्गीय कुटुंबातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे कोणत्या प्रकारचा पोषक आहार घेणे गरजेचे आहे याचा त्यांना पत्ताच नसतो. रुग्णालयात उपचार घेताना रुग्णाला कशा पद्धतीच्या पोषक आहाराची गरज आहे हे आहारतज्ज्ञांकरवी सांगण्यात आले आणि तसा आहार रुग्णालयात असेपर्यंत त्याला मिळाला तरी रुग्णाच्या प्रकृतीमध्ये झटपट सुधारणा होऊ शकेल. मात्र पालिका रुग्णालयातील आहारतज्ज्ञांच्या अपुऱ्या संख्याबळामुळे रुग्णांना आवश्यक तसा पोषक आहार मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी रुग्णालयात मिळणारा सरसकट आहार रुग्णांना घ्यावा लागत आहे.
प्रसाद रावकर, मुंबई

आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोषक आहार घेतल्यास रुग्णाच्या प्रकृतीत झटपट सुधारणा होते. पण पालिकेच्या मोठय़ा रुग्णांमध्ये आहारतज्ज्ञांची संख्या कमी आहे, तर बहुतांश छोटय़ा रुग्णालयात आहारतज्ज्ञच नसल्याचे माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध झालेल्या माहितीद्वारे उघड झाले आहे. पालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा परिणाम रुग्णांच्या प्रकृतीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे माहितीच्या अधिकारात माहिती मिळविणारे सागर शेळके यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

* पालिकेच्या गोवंडी शताब्दी, चेंबूरचे माँ रुग्णालय, विक्रोळीचे महात्मा फुले रुग्णालय, मुलुंड (पू.) येथील वीर सावरकर रुग्णालय, मालाडचे स. का. पाटील रुग्णालय, लिबर्टी रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे मुक्ताबाई रुग्णालय, एम. टी. अगरवाल, शताब्दी बोरिवली आदी रुग्णालयांमध्ये आहारतज्ज्ञच नाहीत. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. त्यामुळे खाटांच्या संख्येनुसार आवश्यक तेवढय़ा आहारतज्ज्ञांची रुग्णालयांमध्ये नियुक्ती करावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सुनील चिटणीस यांनी केली आहे.