शालार्थ वेतनप्रणाली लागू केल्यामुळे राज्यातील खासगी शाळांचे वेतन दरमहा एक तारखेला होईल, असे प्रतिपादन पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालनालयातील शिक्षण उपसंचालक के. पी. देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षण सेवक समितीच्या वतीने आयोजित मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत केले. कार्यशाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे हे होते.    
राज्यातील प्राथमिक शाळांना शालार्थ वेतनप्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्याची सूक्ष्म माहिती व्हावी म्हणून संघटनेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक व लिपिकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याचे उद्घाटन उपसंचालक के. पी. देशमुख यांनी केले. यावेळी देशमुख म्हणाले की, शालार्थ वेतनप्रणालीमुळे वेतन देयकातील मानवी चुका टाळता येतील व अद्यावत माहितीसह वेळेची बचत होईल. त्यामुळे दरमहा एक तारखेला पगार होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी मुख्याध्यापकांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संगणकाचे ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अध्यक्षपदावरून भरत रसाळे म्हणाले की, आमची संघटना केवळ शिक्षकांच्या आर्थिक मागण्यांसाठीच काम करत नाही, तर विद्यार्थ्यांच्या हितासह शिक्षण क्षेत्राला पुढे नेणाऱ्या ज्या बाबी आहेत त्यांना सहकार्य करण्याचे काम करते. शालार्थ वेतन प्रणालीतील बारकावे मुख्याध्यापकांनी व लिपिकांनी अभ्यासावेत असेही आवाहन त्यांनी केले.    
कार्यशाळेस राज्य उपाध्यक्ष सारंग पाटील (पुणे), शशी माळी (सांगली), महादेव डावर (कोल्हापूर), अंजन पाटील (धुळे), शिवाजी भोसले (कोल्हापूर), जी. डी. मोराळे (नांदेड), बाळासाहेब लंबे (कोल्हापूर), सूर्यकांत माने (कोल्हापूर) आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोषकुमार घोडके यांनी केले, तर आभार प्रकाश कोळी यांनी मानले.