शहरात कधी धडाक्यात तर कधी कूर्मपणे सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला बुधवारी नाशिकरोड येथे ‘ब्रेक’ लागला. अतिक्रमण निर्मूलन विभाग साम-दाम-दंड भेद नितीने ही मोहीम राबवत असल्याचा आरोप करत जेलरोड परिसरात पथकावर किरकोळ दगडफेक करण्यात आली. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या रोषांमुळे पथकाला माघारी फिरावे लागले. पथकासमवेत आवश्यक पोलीस फौजफाटा नसल्याने कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला. दगडफेक प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही महिन्यांपासून शहर परिसरात अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यास पालिकेने प्राधान्य दिले आहे. धडाक्यात मोहीम सुरू झाल्यावर काही दिवस ही मोहीम स्थगित करण्यात आली होती. अतिक्रमण काढताना नुकसान होत असल्याने ते टाळण्यासाठी अतिक्रमणधारकांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन पालिकेने केले होते. या पाश्र्वभूमीवर, काही जणांनी अतिक्रमण काढून घेण्यास पुढाकार घेतला. दुसरीकडे या मोहिमेच्या विरोधात आंदोलनही सुरू झाले. काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून मोहीम थांबविण्याची मागणी केली होती. कोणत्याही दबावाला बळी न पडता चाललेल्या या मोहिमेमुळे काही रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यास सुरूवात केली. नाशिकरोड परिसरात बुधवारी या मोहिमेला गालबोट लागले.
अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जेलरोड येथील पाण्याची टाकी ते उपनगर या कॅनाल रस्त्यावरील भाजी विक्रेते, किराणा, मांसाहारी, खाद्य पदार्थ विक्रेते यासह दुकानदार तसेच काही निवासी संकुले अशा ७०० नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. वारंवार सूचित करूनही संबंधितांकडून नेहमी अरेरावीची भाषा व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची पथकाची भावना आहे. पालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत संबंधितांनी आपले अतिक्रमण ‘जैसे थे’ ठेवले होते. या पाश्र्वभूमीवर, बुधवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक, विभागीय अधिकारी चव्हाण यांच्यासह काही पोलीस कर्मचारी या भागात दाखल झाले. पथकासमवेत जेसीबी यंत्रासह इतर सामग्री होती. पथक दाखल झाल्याचे पाहून काही वेळातच अतिक्रमणधारक संघटित होण्यास सुरूवात झाली. माजी नगरसेवक गणेश उन्हवणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मोहिमेला विरोध दर्शविला. संबंधितांनी विरोध केल्यावर अतिक्रमणधारक व विक्रेत्यांना जोर चढला. त्यांनीही विरोध करण्यास सुरूवात केली. त्याकडे दुर्लक्ष करत पथकाने काम सुरू करण्याचा प्रयत्न केला असता जमावाने दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत काही कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
आवश्यक फौजफाटा सोबत नसल्याने अधिकाऱ्यांसह पथकाने तेथून काढता पाय घेणे पसंत केले. या संदर्भात या विभागाचे प्रमुख आर. एम. बहिरम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिक्रमणधारकांना महापालिकेकडून याआधी पूर्वसूचना देण्यात आल्याची माहिती दिली. अतिक्रमणधारकांचे कोणतेही साहित्य जप्त करण्यात आलेले नाही, व्यावसायिकांचे कुठलेही नुकसान करण्यात आलेले नाही. असे असतांना विनाकारण सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न का करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी’
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत काही विशिष्ट घटक वारंवार अडथळे आणत आहेत. वास्तविक, ही मोहीम विक्रेत्यांविरोधात नसतानाही जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात आहे. त्यात काही विक्रेत्यांच्या नेत्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस यंत्रणेने अशा विशिष्ट व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी पालिकेने केली आहे. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे प्रयत्न हाणून पाडण्याचा काहींचा प्रयत्न आहे. त्याचा छडा लावून पोलीस यंत्रणेने त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.