रस्त्यांवरील अपघातांमुळे मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व येणाऱ्या जगातील सर्वाधिक दुर्घटना भारतात घडतात. त्यातील बहुतेक अपघात हे सुरक्षेच्या प्राथमिक नियमांचे पालन न केल्यामुळे होतात, हे वास्तव लक्षात घेऊन ठाण्यातील काही नागरिकांनी प्रायोगिक तत्त्वावर वर्दळीच्या रस्त्याचा काही भागच देखभालीसाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमास महापालिका प्रशासन, वाहतूक पोलीस, वाहनचालक संघटना तसेच शाळांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या मदतीने केवळ एक सप्ताह अथवा पंधरवडय़ासाठी नव्हे नव्या वर्षांपासून कायमस्वरूपी ही योजना राबवली जाणार आहे.
सेफ्टी फॉर माइल्स अर्थात स्माइल्स (सुरक्षा मैलांची- मोलाची) असे या उपक्रमाचे नाव असून पूर्व द्रुतगती मार्गाला छेदून नव्या ठाण्यात प्रवेश करणाऱ्या पोखरण रोड क्रमांक १ वरील कॅडबरी जंक्शन ते वर्तकनगर नाका या सव्वा किलोमीटर लांबीच्या मार्गावर नव्या वर्षांपासून या मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. साधारणपणे रस्त्यावरून नियमितपणे वाहतूक करणारे ८० टक्के नागरिक स्थानिक असतात. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये या मोहिमेविषयी जनजागृती करण्याचे काम सध्या सुरू आहे. श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल, संस्कार पब्लिक स्कूल आणि थिराणी विद्यालयातील हजारो विद्यार्थी या रस्त्याने ये-जा करीत असतात. त्यामुळे ‘स्माइल्स’तर्फे या शाळांमध्ये व्याख्याने देऊन विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्त्व समजावून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या मोहिमेचे संदेश दूत म्हणून काम करावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्याकडून घरोघरी गाडी चालविताना ‘मोबाइल टाळा, हॅल्मेट घाला’ असे वाहतुकीचे साधे-सोपे नियम पोहोचविले जात आहेत. १५ ऑगस्टपासून या मोहिमेची पूर्वतयारी सुरू झाली. त्यासाठी वाहतूकतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रात पथनाटय़े सादर करून नागरिकांच्या मनावर या विषयाचे महत्त्व बिंबविण्यात आले. ‘या परिसरातील प्रत्येक रहिवाशापर्यंत वाहतूक सुरक्षेचा संदेश पोहोचविण्याचा ‘स्माइल्स’चा प्रयत्न आहे. अनेकजण स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून या मोहिमेत सहभागी होत आहेत,’ अशी माहिती डॉ. मृदुला भावे यांनी दिली. डॉ. लता घनश्यामानी, नील देसाई, डॉ. लीना केलशीकर आदी चाळीसजण या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
रहिवाशांप्रमाणेच रिक्षाचालक आणि परिवहन बसचालकांनाही स्माइल्सने या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. त्यासाठी चर्चासत्रे आयोजित करून त्यांची मते जाणून घेतली. त्यात त्यांनी मांडलेल्या सूचनांचा स्वयंसेवकांना मोहीम राबविताना उपयोग होत आहे. तसेच त्यांना भेडसाविणाऱ्या अडचणी वाहतूक शाखा तसेच महापालिका प्रशासनाशी चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न स्माइल्स करीत आहे.
‘एखाद्या गोष्टीचे पालन करा’ असे सांगताना प्रत्यक्षात ती अस्तित्वात आहे का, याचा अनेकदा विचारही केला जात नाही. सुरक्षित वाहतुकीच्या संदर्भात ‘पदपथांचा वापर करा’ ही अशीच एक सूचना असते. कारण अनेकदा वर्दळीच्या रस्त्यांलगतच्या पदपथांवर शेजारच्या व्यापाऱ्यांचे अथवा फेरीवाल्यांचे अतिक्रमण आढळून येते. काही ठिकाणी पदपथांवर घाण असते. त्यामुळे पदपथ असून नसल्यासारखेच असतात.
अगदी शाळेत असल्यापासून ‘झेब्रा क्रॉसिंग’वरून रस्ता ओलांडण्याचे सल्ले मुलांना दिलेले असतात, पण प्रत्यक्षात नियमित रंगरंगोटी न केल्यामुळे सुरक्षेचे हे चिन्ह पुसले गेलेले असते. मोहीम राबविताना स्माइल्सच्या स्वयंसेवकांना अशा अनेक त्रुटी आढळून आल्या असून संबंधितांकडून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.