नागपूर-हिंगणा मार्गावर वानाडोंगरीजवळील नाक्यावर टोल देऊनही या मार्गावर मोठे खड्डे पडलेले आहेत. वारंवार वाहतुकीला अडथळा होत असल्याने परिसरातील नागरिकांनाच या मार्गावरील खड्डे बुजवावे लागत आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर टोल नाका उभारला आहे. रस्त्याची देखभाल करण्यासाठी वाहनधारकांकडून टोल आकारणी केली जाते, पण हिंगणा नाका ते हिंगणा शहरापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनचालक खड्डय़ात पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या मार्गावरील रस्ता दुभाजक अनेक ठिकाणी तुटलेला आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने खड्डे बुजविण्यासाठी नागरिकच सरसावले आहेत.
या मार्गावरील हनुमान मंदिराजवळ पडलेला मोठा खड्डा गजानन नगरातील नागरिकांनी बुजवला. यासाठी ग्रामपंचायत सदस्य अमित भोयर, शिवसेना शाखा अध्यक्ष पिंटू बोथे, नीळकंठ वानखेडे, चंक गवळी, राहुल धाबर्डे, सचिन चौधरी, सुशांत मोहोड, अंतराज पाटील, धम्मा ताडणे, दीपक परबत यांच्यासह नागरिकांनी परिश्रम घेतले.