१ एप्रिलपासून बेस्ट, रेल्वे अशा सार्वजनिक वाहतूक सेवांच्या सुधारित दरांमुळे आर्थिक गणित कोलमडणार याची पूर्वकल्पना मुंबईकरांना होतीच. याबाबत संतापही त्यांच्या मनात धगधगत होताच. यामुळेच बुधवारी सकाळी अणुशक्तीनगर येथील बेस्ट बसच्या स्थानकावर जमलेल्यांनी उत्स्फूर्त आंदोलन केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला पांगवले. असे असले तरी काही वेळाकरिता तरी मुंबईकरांनी आपला संताप व्यक्त करून दाखविला.
बेस्टने या तिकीट दरवाढीचा निर्णय नोव्हेंबरमध्येच घेतला होता. या निर्णयानुसार फेब्रुवारी व एप्रिल महिन्यांपासून बेस्टच्या तिकीट दरात वाढ होणार होती. या नव्या दरवाढीनुसार पहिल्या दोन टप्प्यांपर्यंतचे बेस्टचे तिकीट वाढणार नसले, तरी त्यानंतरच्या टप्प्यांसाठी एक ते दोन रुपयांची घसघशीत दरवाढ होणार आहे. म्हणजे सध्या सहा किलोमीटरच्या टप्प्याचे तिकीट १३ रुपये एवढे आहे. आता ते वाढून १४ रुपये झाले. त्यानंतरच्या टप्प्यांसाठी हे तिकीट दोन रुपयांनी वाढले आहे. या वाढीचा फटका शहरातील लाखो प्रवाशांना बसला आहे.