स्टुडिओमधील भव्य रोषणाई, सजावट, मेकअप आणि आकर्षक वेषभूषा अशा अतिशय कृत्रिम वातावरणात सेलिब्रेटींचे छायाचित्र काढले जाते. अशा वेळी काढलेल्या छायाचित्रातील सेलिब्रेटीचे हावभाव हे नैसर्गिक वाटणे हीच छायाचित्रकाराची खरी कला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सेलिब्रेटी छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांनी ठाणे येथे केले. प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी अविनाश गोवारीकर यांच्यासह अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलाखत घेतली. या वेळी दोघांनी विविध विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या हस्ते गोवारीकर यांना ‘इंद्रधनू विशेष युवोन्मेष’, तर मांजरेकर यांना ‘इंद्रधनू मानबिंदू विशेष सन्मान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय चित्रपटसृष्टीस ‘बॉलीवूड’ म्हणून संबोधले जाणे अपमानास्पद असल्याचे गोवारीकर यांनी मुलाखतीत सांगितले. छायाचित्रण हे क्षेत्र फारच आव्हानात्मक आहे. रिचर्ड अ‍ॅवेडॉन आणि गौतम राजाध्यक्ष हे आपले छायाचित्रणातील आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. स्टुडिओमध्ये सेलिब्रेटी येण्यापासून ते छायाचित्रण सुरू करेपर्यंतचा टप्पा फारच बघण्यासारखा असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात त्यांनी सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘लेजंट’ या शब्दात उल्लेख केला. ‘हम आप के है कौन’ चित्रपटानंतर माधुरीचे काढलेले फोटो आणि त्यानंतर तिने केलेली प्रशंसा फारच आत्मविश्वास वाढवणारी होती, असेही त्यांनी सांगितले. शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान ही तीन वेगळी टोके असून शाहरुखकडे फार कमी वेळ असतो. आमिर प्रत्येक गोष्टीत जरा जास्तच रस घेतो, तर सलमान कोणाचेही न ऐकता स्वत:ला हवे तसेच काम करतो. मात्र तिघांसोबत काम करण्यात वेगळीच मजा असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरेंबरोबर असलेल्या मैत्रीविषयी सांगताना ते प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्त्व असून वडिलानंतर त्यांनीच आपल्याला पहिला कॅमेरा घेऊन दिल्याचे सांगितले. तसेच छायाचित्रणाच्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांचा कॅमेराविषयी असलेला अंदाज कमालीचा होता, असेही त्यांनी सांगितले. साहित्य सहवासात राहत असताना विंदा करंदीकर, य.दि. फडके, म.वि. राजाध्यक्ष, अशोक रानडे या दिग्गजांचे इच्छा असूनही एकत्रितपणे छायाचित्र काढले नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली. किशोरी आमोणकर, सचिन तेंडुलकर, झाकिर हुसेन, रणबीर कपूर यांसारख्या अनेक कलावंतांबरोबर काम करतानाच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. अमिताभ बच्चन यांच्यामध्ये असलेला नीटनेटकेपणा आणि शिस्त आजच्या काळातील अभिनेत्यांमध्ये दिसत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी माणूस तसेच गिरणी कामगारांच्या सद्यपरिस्थितीवरून ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ आणि ‘लालबाग परळ’ या चित्रपटांची संकल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले. वर्तमानपत्रांच्या दैनंदिन वाचनानेच नवनवीन विषयांची ओळख होते, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना त्यांना सिनेमाची अतिशय जाण असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या काळात मराठी नाटकांचा बाजार झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.
 मराठी नाटकांमध्ये नवीन विषय येणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले. मुंबईचे दु:ख ‘लालबाग परळ’मधून दाखवता आले म्हणून हा सिनेमा फारच जवळचा असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास ठाणेकरांनी मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावली होती.