दिवसेंदिवस बदलणाऱ्या निसर्ग चक्राचा अनुभव जिल्ह्यातील शेतकरी घेत असताना पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळेच पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पाच जून रोजी शहरापासून जवळ असलेल्या गंगापूर येथील ‘फाशीचा डोंगर’ हिरवागार करण्याची योजना लोकसहभागातून आखण्यात आली आहे. त्यासाठी ‘आपलं पर्यावरण’या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत डोंगरावर दहा हजार पेक्षा जास्त पर्यावरणपूरक रोपे लावण्याचा आणि त्यांना जगवून त्या ठिकाणी एक छोटेखानी वन तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. एखाद्या शहरात एकाच दिवशी, एकाच ठिकाणी दहा हजार पेक्षा जास्त रोपे लावण्याचा हा एक विक्रम होणार असून वन तयार झाल्यावर येथे पक्षी निरीक्षण केंद्र आणि वनौषधी परिचय केंद्र तयार करण्याचाही आपलं पर्यावरणचा मनोदय आहे.
एकेकाळी प्रत्येक गावाजवळ एक जंगल असायचं. जिथे कुऱ्हाड बंदी, चराई बंदी असायची. हे जंगल त्या त्या गावातील विविध प्रकारच्या गरजा भागविण्याचे काम तर करायचंच, पण वन्यजीव आणि पक्षांसाठी निवारा आणि खाद्य सुद्धा उपलब्ध करून देत होते. त्यामुळे निसर्ग चक्र अगदी व्यवस्थितपणे सुरू होते. वन्य जीव आणि मानवी जीवाला त्याचा विशेष फटका बसत नव्हता. माणसाने आपल्या हव्यासापोटी जंगल नष्ट करून निसर्गातील संतुलन बिघडविण्यात मोठा हातभार लावला आहे. हे दुष्टचक्र थांबविण्याचा एक अल्पसा प्रयत्न आपलं पर्यावरण ग्रुप वन महोत्सवाव्दारे करत आहे. प्रचंड प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड डोंगरांचे सौंदर्यच नष्ट करत आहेत. वृक्षराजी भूस्खलन रोखण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी करतात. परंतु वृक्षतोडीमुळे त्यास अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्यामागे हेही एक कारण आहे. या पाश्र्वभूमीवर आपलं पर्यावरण ग्रुपच्या उपक्रमाचे महत्व लक्षात येऊ शकेल.
शहरामध्ये लोक सहभागातून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची चळवळ व्यापक व्हावी, हाही एक हेतू त्यामागे आहे. दंडकारण्य आणि तपोवन यांचा वारसा असलेल्या नाशिकच्या पुढील पिढीला शहराजवळ वन काय आणि कसे असते हे बघता यावे, सोबतच अफाट काँक्रिटीकरणामुळे लुप्त होत चाललेल्या चिमण्या आणि इतर पक्षांना एक हक्काचा निवारा मिळावा आणि आपल्याला शहराजवळ त्यांचे निरीक्षण करण्याची आणि त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची सोय व्हावी म्हणून हा प्रयत्न करण्यात येत आहे. वन खात्याच्या सहकार्याने नाशिकमधील विविध संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी मिळून हा वन महोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करण्याचे आ़वाहन करण्यात आले आहे. यासाठी मागील दीड दशकापासून नाशिक शहर आणि परिसरात सुमारे लाखभर झाडे लावून जगविणारे आणि चिमण्यांसाठी बारा हजारपेक्षा अधिक घरटे तयार करून त्यांचे वितरण करणारे वृक्षमित्र आणि पक्षीमित्र शेखर गायकवाड आणि त्यांचा ‘आपलं पर्यावरण’ ग्रुपने हा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आहे. सर्व नाशिककरांनी हा संकल्प पूर्ण करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन करतानाच पुढील तीन वर्ष या झाडांचे संगोपन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी शेखर गायकवाड आणि त्यांचा ग्रुप पार पाडणार आहे.
या उपक्रमासाठी वन विभागाने परवानगी दिलेली असून पाच जून रोजी नाशिककरांनी कुटुंबियांसोबत वन महोत्सवात सहभागी होऊन स्वत: रोप लावण्याचा आनंद घेता येईल. त्यासाठी घरून पाच लिटर पाण्याने भरलेली कॅन आणणे आवश्यक आहे. संस्थेच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी तसेच विविध स्वरूपातील सूचना करण्यासाठी आपलं पर्यावरण संस्थेचे प्रमुख शेखर गायकवाड यांच्याशी ९४२२२६७८०१, अक्षय भोगले ९७६७००३४६० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.