ग्रहताऱ्यांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टिकोनातून करा, विश्वामधील खागोलीय घडामोडी संदर्भात अंधश्रद्धांना बळी पडू नका, असे आवाहन इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित ‘इन्स्पायर इंटर्नशिप सायन्स कॅम्प २०१४’ कॅम्पमध्ये आकाश निरिक्षण या विषयावर ते अभ्यासपूर्ण विवेचन करत होते.
प्रा. डॉ. शिंदे म्हणाले, की सूर्यमालेसारख्या अन्य असंख्य सूर्यमाला आणि दीर्घिका या विश्वामध्ये आहेत. त्यांच्या हालचाली व घडामोडींसदर्भात बाऊ न करता, त्यावर शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास होणे आवश्यक आहे. कडक मंगळ, राशी, नक्षत्रं, विविध प्रकारचे योगायोग यांचा ग्रहताऱ्यांशी सुतराम संबंध नाही. ते आपआपल्या कक्षांमध्ये मार्गक्रमण करत असतात. त्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून विविध खगोलीय घडामोडींविषयी निष्कर्ष काढणे आवश्यक आहे. परंतु तसेच न होता, उलट अनेक गैरसमज पसरवले जातात, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. यानंतर डॉ. शिंदे व त्यांचे सहकारी प्रा. प्रताप पाटील व शंकरराव शेलार यांनी विद्यार्थ्यांना दुर्बिणींमधून गुरू, चंद्र आदी ग्रहांचे दर्शन घडविले. आकाशात दिसणाऱ्या विविध ग्रहताऱ्यांविषयी रंजकपणे माहिती दिली. शिबिरात डॉ. लता जाधव व अशोक रूपनर यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आदी शास्त्रांमधील प्रयोगांचे उत्तम सादरीकरण केले. बहुतांश प्रयोगांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी दिली. डॉ. योगेश शौचे, एन. डी. देशमुख, जयंत पवार यांनी जीवशास्त्रांशी संबंधित सूक्ष्मजीवशास्त्र जैवतंत्रज्ञान, जैवविविधता यासंदर्भात माहिती दिली. शिबिरास सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातून विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. बी. गांधी यांनी केले.