मराठी नाटकधंद्याचे दिवस फारसे बरे चालले नसताना आता नाटय़निर्मात्यांपुढे पालिकेच्या एका निर्णयाने आणखी संकट उभे केले आहे. महापालिकेच्या अखत्यारितील नाटय़गृहांमध्ये १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शिवाय या भाडय़ात दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ करण्यात यावी, असेही संबंधित आदेशात म्हटले आहे. या आधीची दरवाढ करताना, जुलै २०११ मध्ये, नाटय़निर्मात्यांशी चर्चा करण्यात आली होती. मात्र ही दरवाढ करताना कोणलाही विचारात घेण्यात आले नाही. महापालिकेच्या अखत्यारित शहरातील चार नाटय़गृहे येतात. यात बोरिवलीचे प्रबोधनकार ठाकरे, पाल्र्याचे दीनानाथ मंगेशकर, बिर्ला नाटय़मंदिर आणि मुलुंडचे कालिदास नाटय़मंदिर यांचा समावेश आहे. या नाटय़गृहांच्या भाडय़ात, अनामत रकमेत ऑक्टोबर २०१२ पासून १० टक्के वाढ करण्यात आली आहे. नाटय़गृहातील ठोकळे, लाइट्स, लेव्हल्स आदी गोष्टींच्या भाडय़ांतही १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच ठाण्यापासून इतर सर्वच महापालिकांनी सेवा कर रद्द केला असला, तरी मुंबई महापालिकेच्या नाटय़गृहांत सेवा कर आकारण्यात येत असल्याने नाटय़निर्मात्यांचे तिहेरी मरण ओढवले आहे.जुलै २०११ मध्ये भाडेवाढ करताना नाटय़गृहाच्या व्यवस्थापकांनी नाटय़निर्मात्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर सामोपचाराने वाढीव भाडे ठरवण्यात आले होते. मात्र ही भाडेवाढ करताना एकाही निर्मात्याबरोबर चर्चा करण्यात आली नसल्याचे समजते. याआधीही निर्मात्यांना विश्वासात न घेता भाडेवाढ केल्याने निर्मात्यांनी पालिकेच्या नाटय़गृहांवर बहिष्कार टाकण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे आताही तशीच प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.आहे.