गणेशोत्सव काळात मंडपामध्ये आणि परिसरात शुभेच्छा देणारे राजकीय नेत्यांचे आणि व्यावसायिकांच्या बॅनरची गर्दी पाहावयाला मिळते. मात्र सध्या कळंबोलीतील सिडको वसाहतीतील काही बॅनर हे सर्वाचे लक्ष वेधत आहेत. कारण हे बॅनर आहेत, सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या आभार प्रदर्शनाचे. वसाहतीतील गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेला खेळाच्या मैदानाचा प्रश्न निकाली काढल्याने वसाहतीतील तरुणांनी हे आभार व्यक्त करणारे बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे सर्व सरकारी परवानग्या घेऊन हे बॅनर लावण्यात आले आहेत.
कळंबोलीमधील तरुणांना खेळण्यासाठी मैदान मागूनही सिडको देत नव्हती. विचारणा केल्यास विविध विद्यालयांना दिलेल्या मैदानांकडे सिडको प्रशासन बोट दाखवून आपली बाजू सावरत होती. गेल्या वर्षी वसाहतीमध्ये आलेल्या सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्यासमोर हा प्रश्न मांडल्यानंतर मैदानांच्या हक्काची जागेची फाइल हलण्यास सुरुवात झाली. कामोठे थांब्याजवळचे मैदान मिळणार या आनंदाने तरुणांनी सिडकोच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त केले. मात्र त्यानंतरही फाइल अडगळीत पडली. हा प्रश्न अखेर व्यवस्थापकीय संचालक भाटियांसमोर गेला. त्यांनी युद्धपातळीवर वसाहतीमधील माथाडी कामगारांच्या मुलांच्या खेळण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देत हा प्रश्न मार्गी लावला.
यामुळे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मैदानाची अद्ययावत उभारणी आणि देखभाल करण्यासाठी १ कोटी रुपयांची निविदादेखील काढली. यामुळे कळंबोलीच्या परिसरात सध्या हे बॅनर झळकत आहेत. यावर सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव आणि व्यवस्थापकीय संचालक संजय भाटियांचे छायाचित्र झळकत असून तरुणाईने आभार व्यक्त केले आहेत. काही बॅनर हे वसाहतीतील सिडको कार्यालयाजवळ झळकत आहेत. विशेष म्हणजे याच कार्यालयासमोर गेल्या वर्षी लहानगी मुले गटारावर झाकणे नसल्याने पडत असल्याचे बॅनर नागरिकांनी झळकविले होते. या बॅनरच्या माध्यमातून निष्र्किय असलेल्या अधिकाऱ्यांसाठी एक चपराक असल्याचे बोलले जात आहे. भाटिया यांच्या कामाच्या पारदर्शकतेच्या पद्धतीमुळे कळंबोलीचे चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे. सिडकोच्या याआधी आलेले अनेक व्यवस्थापकीय संचालकांनी चांगले निर्णय वसाहतीसाठी घेतले आहेत. मात्र तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरलेले आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लावलेल्या बॅनरमधून दिसणारे पहिलेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.