लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी असली तरी अनेक ठिकाणी आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात ही स्थिती जाणवत आहे. अशा स्थितीमुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादी तर, नंदुरबार व धुळ्यात काँग्रेस हादरले आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मदतीला ज्याप्रमाणे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे धावून जात आहेत. त्याप्रमाणे संकटात सापडलेल्या काँग्रेस उमेदवारांच्या मदतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज (बाबा) चव्हाण यांनी धावून येण्याची अपेक्षा नंदुरबार आणि धुळ्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पृथ्वीराज चव्हाण ज्यांना ‘बाबा’ म्हणून आदारार्थी संबोधले जाते. त्यांनी लवकरात लवकर या दोन्ही मतदारसंघातील परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी तेथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून तर, नाशिक मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते फटकून वागत असल्याने राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना ‘बाबाजी, लक्ष असू द्या’ अशी आळवणीच जणू काही होत आहे.
नाशिक मतदारसंघात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. सिन्नर येथे आ. माणिक कोकाटे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात तर कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. आमदारांनी भुजबळांचा प्रचार करण्याचे जाहीर केले असले तरी कार्यकर्ते मात्र महायुतीचा जयजयकार करत आहेत. या परिस्थितामुळे हबकलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच बाबांनी या प्रकरणात लक्ष घालून काँग्रेस कार्यकर्त्यांना आघाडीचा धर्म पाळण्याचे आवाहन करण्यासाठी विनवित आहेत. धुळे मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आ. अमरीश पटेल यांना तर, स्वकीय आणि राष्ट्रवादीतील असंतुष्टांनाही शांत करावे लागत आहे. ग्रामीण भागात काँग्रेसचेही अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारापासून दूरच आहेत. काही गावांमध्ये तर त्यांच्याकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार होत असल्याचे दिसून येते. निवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक राहिल्याने ही परिस्थिती दूर करण्यासाठी बाबांनी लक्ष देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
नंदुरबार मतदारसंघात दहाव्यांदा विजयी होण्यासाठी माणिकराव गावित सर्वदृष्टिने प्रयत्न करत असताना महायुतीच्या हीना गावित यांचे तगडे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिल्याने येथील निकाल अनिश्चित झाला आहे. हीना गावित यांचे पिताश्री माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या गळाशी लावण्याचा प्रयत्न सुरू केल्याने माणिकराव हे चांगलेच धास्तावले आहेत. सोनिया गांधी यांची सभा आयोजित करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची त्यांना अपेक्षा आहे. बाबांनी मतदारसंघातील आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यास ते एकसंघपणे प्रचारास लागू शकतील. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात सहभागी होण्यासाठी बाबांनी शरद पवार यांना सूचवावे अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रावेर मतदारसंघात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांचे आव्हान पेलताना राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांची दमछाक होत असताना त्यातच काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची अपक्ष उमेदवारी जैन यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. डॉ. पाटील हे आघाडीच्याच मतांमध्ये वाटेकरी होणार असल्याने जैन हबकले आहेत. अनेक काँग्रेसजन जैन यांच्याऐवजी डॉ. पाटील यांच्या प्रचारात गुंतले आहेत. काँग्रेसजनांना राष्ट्रवादीला सहकार्य करण्यास सांगण्यात यावे आणि ते काम पृथ्वीराजबाबांनी करावे अशी जैन समर्थकांची अपेक्षा आहे.

Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
NCP clock symbol
अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा
Wardha Lok Sabha
वर्ध्यात महाविकास आघाडीत त्रांगडे
Mahavikas Aghadi meeting regarding seat allocation in Lok Sabha elections will be decided today Mumbai
शिवसेना २०, काँग्रेस १८, राष्ट्रवादी १० जागा लढणार? महाविकास आघाडीच्या बैठकीत आज निर्णय