दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेली पाण्याची टंचाई अन् चाराटंचाई लक्षात घेऊन प्रत्येक गावात चारा छावणी व मागेल त्यास पाण्याचे टँकर देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, सर्वच साखर कारखान्यांनी चारा छावणीसाठी १०० एकर ऊस ठेवून द्यावा, असे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सर्वाना आदेश दिले.
प्रांत कार्यालयाचे सांस्कृतिक हॉल येथे सोमवारी दुष्काळ निवारणाकरिता काय उपाययोजना करता येईल, शासनाकडून काय काय मदत दिली जाणार, यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार भारत भालके, प्रांत बाबासाहेब बेलदार, तहसीलदार सचिन डोंगरे, पंढरपूर तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हजर होते.
जिल्हय़ातील दुष्काळाची पाहणी करण्यास दि. २३, २४, २५ फेब्रुवारी असे तीन दिवसांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत, असे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी ही माहिती दिली. या वेळी आलमट्टी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडावे अशी मागणी करण्यात येणार आहे.