शेतकऱ्याच्या शेतात कोणत्याही रासायनिक खतांशिवाय (ऑर्गनीक पद्धतीने) पिकलेला भाजीपाला दलालांच्या मध्यस्थी शिवाय ठाण्यातील नागरिकांना थेट उपलब्ध होऊ शकणार आहे. शहरात राहणाऱ्या शेतक ऱ्यांच्या मुलांनी पुढाकार घेऊन ही अभिनव योजना राबवली असून ‘सात्त्विक’ या ब्रॅडचा भाजीपाला लवकरच नागरिकांना घरपोच प्राप्त होऊ शकणार आहे. ठाण्यातील दोस्ती विहार गृहसंकुल येथे भाजीपाल्याच्या प्रदर्शनातून या उपक्रमाची सुरुवात शनिवारी होणार असून या उपक्रमाच्या उद्घाटनास राज्यातील शेतकरी, कृषी तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
ठाण्यातील वर्तकनगर येथील दोस्ती विहार गृहसंकुलामध्ये सुमारे १८०० हून अधिक कुटुंबं वास्तव्यास आहेत. या गृहसंकुलात राहणारे नीलेश प्रभू, सुहास धनावडे, अजय राऊत, राजू भोसले, सतीश सूर्यवंशी, गिरीश अवटे हे वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत. गावी राहून शेतीच्या उत्पन्नातून येणाऱ्या पैशातून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. मात्र कष्ट करून पिकवणाऱ्या भाजीला बाजारात मोठी किंमत असली तरी शेतक ऱ्यांच्या हाती मात्र अत्यंत तुटपुंजी रक्कम येते, असे या तरुणांचे म्हणणे आहे. शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याची खंत असलेल्या या मंडळींनी शेतामध्ये पिकलेला गुणवत्तापूर्ण शेतमाल ग्राहकांना थेट उपलब्ध करून देण्याचा निश्चय केला. ग्राहकांना पुरवला जाणारा शेतमाल हा रासायनिक खतांशिवाय म्हणजेच शंभर टक्के ऑर्गनीक पद्धतीनेच पिकवला पाहिजे, असा निष्क र्ष त्यांनी ठरवून घेतला. शिवाय या आरोग्यदायी भाजीला ‘शाश्वत’ अशी ओळख देण्यात आली. मागील वर्षभरापासून या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्ण तयारी करण्यात आली असून शनिवारी या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. दोस्ती गृहसंकुलामध्येच या शेतमालाचे प्रदर्शन मांडण्यात येणार असून त्यामध्ये नागरिकांच्या शेतमालाविषयीच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.
घरपोच भाजीची ऑनलाइन सेवा..
पाच व्यक्तींच्या कुटुंबाला आठवडाभर पुरेल इतकी पाच किलो भाजी एका टोपलीतून (बास्केट)  घरपोच उपलब्ध करून देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. ही भाजी मागवण्यासाठी ग्राहकांना ऑनलाइन नोंदणी करता येऊ शकणार आहे. २५ प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांचा यात समावेश असून गाजर, काकडी, मिरची, कोथिंबीर, आले आणि ओल्या मसाल्याचा पुरवठा या टोपलीतून केला जाणार आहे. प्रत्येकाच्या मागणीनुसार भाजीपुरवठा केला जाणार आहे. सध्या शहरातील दोस्ती, वेदांत, रुणवाल प्लाझा तसेच पाचपाखाडी येथील सोसायटय़ांमधील एक हजाराहून अधिक कुटुंबांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. रसायनिक खतामुळे उत्पादन वाढत असल्याने अशा भाज्यांची किंमत अत्यंत मर्यादित असते, मात्र ऑर्गनीक फार्मिगमुळे कमी पीक येऊन भाज्यांची किंमत वाढत असते. मात्र या उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा दलालांचा विळखा नसल्याने ही ऑर्गनीक भाजीसुद्धा इतर भाज्यांच्या किमतीमध्येच उपलब्ध होऊ शकणार आहे.