बेस्ट, रेल्वे, गॅस, डिझेल.. महाग झालेल्या वस्तूंची यादी अनंत आहे. १ जानेवारीपासून सरकारच्या महागाईच्या वरवंटय़ाखाली आता घरेही आली आहेत. वेगवेगळ्या भागातील घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांच्या आधारे तेथील जागांचे बाजारभाव (रेडी रेकनर) सरकार निश्चित करते. साधारणपणे रेडी रेकनरपेक्षा प्रत्यक्षातील जागांचे भाव अधिक असतात. मात्र या वर्षी सरकारनेच रेडी रेकनरच्या मागील वर्षीच्या दरांमध्ये मोठी दरवाढ केली आहे. त्याचा फायदा उचलत बिल्डर मंडळी आपल्या सदनिकांचे भाव वाढविणार हे सांगण्यासाठी ज्योतिषांची गरज नाही. कर्ज काढून घर घेणाऱ्या मध्यमवर्गीयांनाच या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसणांर आहे.
राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या रेडी रेकनरचे दर पाहता वांद्रे ते दहिसरदरम्यान गोरेगावमधील पहाडी परिसर, गुंदवली, मालाड, पोयसर हा भाग घर खरेदीच्या दृष्टीने ‘हॉट डेस्टीनेशन’ ठरतो आहे. कारण या भागातील रेडी रेकनरचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २० ते २५ टक्क्य़ांनी वाढले आहेत. अंधेरी, बोरिवली, मालाड या भागात मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या बांधकामांमुळे घर खरेदीचे व्यवहार या परिसरात होण्याचे प्रमाण जास्त आहे. परिणामी येथील रेडी रेकनरचा दरही वाढतो आहे. अंधेरी येथील रेडी रेकनरचा दर २० टक्क्य़ांची वाढ दर्शवितो. त्यामुळे गेल्या वर्षी प्रतिचौरस फूट नऊ हजारांच्या आसपास असलेला येथील रेडी रेकनरचा दर ११,३०० वर गेला आहे. गुंदवली परिसरातील घरांनाही चांगली मागणी आहे असे दिसते. त्यामुळे ७,९००च्या आसपास असलेला येथील रेडी रेकनरचा दर ९, ६०० वर गेला आहे. मालाड पूर्व भागातील दुकानांच्या रेडी रेकनरच्या दरांमध्ये सुमारे १३६ टक्क्य़ांनी वाढ आहे. मालाडच्या उत्तर भागापेक्षाही दक्षिण आणि पूर्व मालाड परिसरात अधिक किंमत देऊन घरे विकत घेतली जात आहेत. त्यामुळे तेथील रेडी रेकनरचा दरही अधिक आहे. गेल्या वर्षी सहा हजारांच्या आसपास असलेला मालाड येथील घरांचा भाव ७,३०० रुपये प्रति चौरस फूट झाला आहे. वळणी, चारकोप, गोराई, मागठाणे, एक्सर या भागातही घरांच्या किंमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ ते २० टक्क्य़ांच्या आसपास वाढ झाली आहे. खरेदीदार विकासकाकडून कोणत्याही किंमतीत घर विकत घेत असला तरी मुद्रांक शुल्क भरताना ते त्या त्या भागातील सरकारी भावानुसारच (रेडी रेकनर किंवा बाजारभाव) भरले जाते. मुद्रांक शुल्क भरताना रेडी रेकनरच्या १० ते १५ टक्के जास्त फ्लॅटची किंमत दाखविली जाते. मागील वर्षी झालेल्या घर खरेदीच्या व्यवहारांवर पुढील वर्षीचा बाजारभाव ठरत असल्याने रेडी रेकनरच्या दरांमध्येही दरवर्षी १० ते १५ टक्के इतकी वाढ अपेक्षित असते. परंतु, ‘या वर्षी सरासरी ३० टक्के वाढ केल्याने घर ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होणार आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘दि आर्किटेक्ट पब्लिशिंग कॉपरेरेशन ऑफ इंडिया’चे संतोष कुमार यांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात घर खरेदी करताना विकासक रेडी रेकनरच्या ४० ते ५० टक्के इतके जास्त किंमत खरेदीदाराकडून वसूल करीत असतो. अधिकृत किंमतीच इतक्या वाढल्या तर विकासकांना आपल्या घरांच्या किंमती वाढविण्याचे आयतेच कारण मिळते. भविष्यात रेडी रेकनरच्या दरानुसार मालमत्ता करही भरावा लागणार आहे.
पोयसर २२ हजारांवर?
सरकारने जाहीर केलेल्या रेडी रेकनरच्या दरानुसार पोयसरमध्ये तब्बल २१९ टक्क्य़ांची वाढ दर्शविली आहे. गेल्या वर्षी या भागात प्रति चौरस फूट ७ हजार रुपयांच्या आसपास भाव होता. यंदा तो २२ हजारांवर गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही दलालांच्या मते तर ही छपाईची चूक आहे. कारण, वांद्रे ते दहिसर या पट्टय़ात कुठेच इतकी दरवाढ झालेली नाही.

वांद्रे ते दहिसर भागातील काही रेडी रेकनर
ठिकाण        २०१२    २०१३    वाढ(टक्केवारीनुसार)
परीघ खाडी    ५८२७    ६९९३    २०.०२
अंधेरी        ९३८९    ११३४०    २०.८१
गुंदवली        ७९८७    ९६१७    २०.४०
पोयसर        ७१७१    २२,८९२    २१९.२३
एरंगळ        ३४१०    ४९१०    ४३.९६
बोरीवली        ५७४७    ७२४७    २६.१२
पहाडी, गोरेगाव        ७३९४    ९१५२    २३.७८
(प्रति चौरस फूटानुसार)