चोरीचे सोने खरेदी केल्याच्या आरोपावरून चार सराफांना अटक झाली. या पाश्र्वभूमीवर आता पुन्हा सराफा व्यावसायिक व पोलीस समोरासमोर उभे ठाकले आहेत. ‘सर्वच सराफांना चोर समजले जात आहे’, असा बागुलबोवा उभा करून त्याआधारे दबावतंत्राचा अवलंब केला जात असल्याचा मतप्रवाह जोर धरू लागला आहे.
सोनेगाव पोलिसांनी चेन स्नॅचिंगप्रकरणी दोन आरोपींना अटक केली. त्यांनी चोरलेले सोने काही सराफांना विकल्याचे सांगितले. चोरटय़ांच्या माहितीवरून पोलिसांनी कॉटन मार्केटमधील उदापुरे ज्वेलर्सचे अनुप उदापुरे, जुनी मंगळवारीतील जे.डी. ज्वेलर्सचे मालक मनीष पारेख, जुनी मंगळवारीतील पुरुषोत्तम ज्वेलर्सचे मालक पुरुषोत्तम हेडाऊ, मांजरे ज्वेलर्सचे मालक अशोक मांजरे यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. त्यांनी दोनशे ग्रॅम सोने खरेदी केले. न्यायालयांने या चौघांना शनिवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या चार सराफांना अटक केल्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व सराफा व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध केला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे त्यांनी कैफियत मांडली तसेच सहपोलीस आयुक्तांना निवेदनही सादर केले.
या चार सराफांनी चोरीचे सोने खरेदीच केले नसल्याचा दावा इतर सराफांचा आहे. सराफा चोरीचे सोने खरेदी करीत नाहीत. तरीही पोलीस नेहमीच बळजबरीने व्यापाऱ्यांकडमून सोने जप्त करतात. या चौघाच्याही दुकानांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे आहेत. सोनेगाव पोलिसांनी त्यातील चित्रीकरण तपासले नाही. चोरटय़ाने सांगितलेली वेळ व कॅमेऱ्यातील वेळ यांचा ताळमेळ नाही. चोरटे सांगतात त्या तारखेच्या आधी व नंतरच्या दिवसांचे चित्रीकरण पाहिले तरी त्यात संबंधित चोरटे आलेले नाहीत, हे सिद्ध होते, असे इतवारी सोने-चांदी ओळ असोसिएशनचे अध्यक्ष रविकांत हरडे व उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र सुवर्णकार महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, व्यापाऱ्यांच्या अटकेच्या निमित्ताने सराफा व्यावसायिक व पोलीस पुन्हा समोरासमोर आले आहेत. शहरात चेन स्ॅनचिंग तसेच चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे चोरीचे सोने शेवटी कुठे जाते, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच ठाऊक आहे. मध्यंतरी अशा घटना घडत होत्या आणि प्रत्यक्ष आरोपींना अटकही होत होती. सोने जप्त होत असले तरी ते काहीच प्रमाणात. मध्यंतरीच्या काळात चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफांना अटक केली जात नव्हती. सात वर्षांपूर्वी सराफांनी असेच आंदोलन केले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त शिवप्रतापसिंह यादव यांनी पुढाकार घेऊन सराफांना विश्वासात घेत चर्चा केली. त्यांनी पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये समन्वय ठेवत दक्षता समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून तपास केला जात होता. त्यामुळे बळजबरी थांबली, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कुणी चोरीचे सोने खरेदी केले असलेच तर ते जप्त होत होते.
काहीवर्षे सुरळीत चालले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांचा जाच सुरू झाल्याची व्यापाऱ्यांची भावना झाली. छत्तीसगड पोलिसांनी सोने जप्त केले, नंदनवन पोलिसांनी सोने जप्त केले. त्यानंतर आता सोनेगाव पोलिसांनी चार व्यापाऱ्यांना अटक केल्याने सराफा पेटून उठले. लाखो रुपयांचा विक्रीकर भरणारे, चोरटय़ाने बोट दाखविल्याने व्यापाऱ्यांना पोलीस चोर ठरवतातच कसे, असा  व्यापाऱ्यांचा थेट सवाल आहे.
सर्वच सराफा गैरप्रकार करतात, असे पोलिसांना अजिबात वाटत नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चारही व्यापाऱ्यांच्या सुटकेचा सराफांचा आग्रह आहे. आजही व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवल्याने सुमारे दीडशे कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकली नाही.
दरम्यान, ‘सर्वच सराफांना चोर समजले जात आहे’, असा बागुलबोवा उभा करून त्या आधारे दबावतंत्राचा अवलंब केला जात असल्याचा मतप्रवाहही येथे जोर धरत आहे.