आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपये लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने अटक केली. मनोहर गवारे असे या पोलीस निरीक्षकाचे नाव असून तो कुर्ला (पूर्व) येथील विनोबा भावे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
विनोबा भावे पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणात संतोष नावाच्या टेम्पो चालकाला अटक केली होती. पोलीस निरीक्षक मनोहर गवारे यांच्याकडे हा तपास होता. संतोषला न्यायालयातून जामिनावर सोडण्यासाठी अनुकूल अहवाल तयार करण्यासाठी १ लाख रुपये द्यावे लागतील, असे गवारे यांनी आरोपीच्या वडिलांना सांगितले. आरोपीचे वडील हमालीचे काम करतात. शेवटी रक्कम २५ हजार रुपयांवर ठरली. फिर्यादीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. बुधवारी कुर्ला येथील बरकत इस्लाम शाळेजवळ गवारे यांनी फिर्यादीला पैसे देण्यासाठी बोलावले होते. त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावून गवारे यांना अटक केली. काही वर्षांपूर्वी विनोबा भावे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोडसे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तर दोन वर्षांपूर्वी एका पोलीस उपनिरीक्षकाविरोधात बलात्काराती तक्रार दाखल करण्यात आली होती. तर गेल्या वर्षी पोलीस ठाण्यातीलच एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.