मुंबई नाका परिसरातील चौफुलीजवळ मद्यधुंद टोळक्याने ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सागर वैद्य आणि कॅमेरामन किरण कटारे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी वडाळा गावात शोध मोहीम राबवत चार संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास संदीप हॉटेलजवळ ही घटना घडली होती. दैनंदिन कामकाजासाठी वैद्य हे कॅमेरामनसोबत दुचाकीवर निघाले होते. रस्त्यावर गर्दी असल्याने मार्ग काढत पुढे जात असताना रिक्षातून आलेल्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ का करत आहात याबद्दल विचारणा केल्यावर रिक्षातील सहा ते सात जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने रिक्षातील लाकडी दांडक्याचा वापर केला.
अचानक घडलेल्या या प्रकाराने वैद्य व कॅमेरामन भेदरले. याचवेळी या मार्गावरून आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचे कॅमेरामन हेमंत बागूल मार्गस्थ होत होते. मारहाणीचा प्रकार पाहून ते मदतीला धावले. टोळक्याच्या तावडीतून वैद्य व कटारे यांची सुटका करण्यात आली. यावेळी गर्दीतून बागूल यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट कोणीतरी ओढून नेले. दरम्यानच्या काळात वाहतूक पोलिसाने धाव घेऊन रिक्षा चालकास ताब्यात घेतले. मारहाणीत जखमी झालेल्या वैद्य यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पकडलेल्या संशयिताचे नांव वसंत बंदरे असे असून तो वडाळा भागातील आहे. हा धागा मिळाल्यावर पोलिसांनी त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी मध्यरात्रीपासून वडाळा गावात शोध मोहीम राबविली. शुक्रवारी दुपापर्यंत आणखी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
 त्यातील काही जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती आहे. संशयितांची ओळखपरेड झाल्यावर त्यांना अटक केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.