कामोठे वसाहतीमध्ये सिटीबस बंद करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. राजकीय शक्ती वापरून झाली, परंतु हे प्रयत्न फसल्याने अखेर गुरुवारी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी ५७ क्रमांकाच्या एनएमएमटी बसवर भ्याड हल्ला केला. बस थांबवून चालक व वाहक यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान, एनएमएमटी बसचालकाला मारहाण करणाऱ्या दोनही हल्लेखोरांना पोलिसांनी पकडले आहे. मारेकरी रिक्षाचालक नसून जीपचालक आहेत. तानाजी सहदेव वनवे व राकशे रावसाहेब वाळके अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही ओएनजीसी उसर्ली येथील घरकुल सोसायटीत राहणारे आहेत. हे दोघेही रात्री कामोठे येथे पिकअप जीप मालकाला देऊन घरी जात असताना त्यांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. हल्ल्यामागे नेमके काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
गुरुवारच्या एनएमएमटी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याविरोधात प्रवासीवर्गाने ठाम उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी रविवारी कामोठे पोलीस ठाण्यात कफ संस्थेच्या माध्यमातून पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे. वीस दिवस झाले तरीही येथील रिक्षाचालकांचा विरोध न क्षमल्याने नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता रेल्वे मानसरोवर रेल्वेस्थानकात प्रवाशांना घेऊन जात असताना ही घटना घडली. बस सेक्टर २० येथील सेंट्रल बॅंकेसमोर आल्यावर दोन दुचाकीस्वारांनी ही बस रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बसला का रोखताय असा जाब विचारणाऱ्या बसचालकांशी दुचाकीस्वाराने भांडण सुरू केले. आमच्या पोटावर पाय देताय असे बोलून या दुचाकीवरील दुकलीने लाथाबुक्क्यांनी चालक व वाहकाला मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. ही घटना मध्यरात्री घडल्याने शेवटच्या लोकलमधील प्रवाशांची संख्या कमी होती, तसेच पोलीस बंदोबस्तही बसमध्ये नव्हता याची खात्री करून हा हल्ला करण्यात आला. चालक व वाहकाच्या बाजूने प्रतिकार करणारे तेथे कोणीही नव्हते. त्यामुळे हल्लेखोरांना निसटता आले. बस व प्रवाशांवर हल्ला होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त काढून घेतल्याने हल्लेखोरांनी संधी साधली.
काही दिवसांपूर्वी कामोठेमधील बससेवा सुरू करून पोलीस बंदोबस्त देतात म्हणून एका पोलिसाला काही रिक्षाचालकांनी घेराव घालून मारहाण केली होती. त्यावेळी घटनास्थळी शंभराहून अधिक पोलीस काही मिनिटांत जमा झाले होते. त्यानंतर ही दुसरी घटना. कामोठे येथील प्रवाशांच्या वाटेला आलेला बसचा स्वस्त प्रवास कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठीचा हा सर्व खटाटोप आहे. या घटनेमुळे खांदेश्वर रेल्वेस्थानक ते खांदा कॉलनी ही बससेवा सुरू होऊ नये आणि याला खीळ बसावी म्हणून हा केलेला प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्रवासी रविवारी एकवटणार
रिक्षाचालक विरुद्ध बसप्रवासी असा हा लढा कामोठय़ात सुरू झाला. यामध्ये राजकीय शक्ती आली ,पण प्रवाशांनी त्यामध्ये कधीही थेट उडी घेतली नाही. त्यामुळे कोणाच्या मागणीवरून ही बससेवा सुरू केली, असे उलट टोमणे एनएमएमटी व पोलीस अधिकाऱ्यांना ऐकण्याची वेळ आली. ज्या प्रवासीवर्गासाठी प्रशासनाने बोलणी खाल्ली त्याच प्रशासनाच्या पाठीमागे प्रवासी ठाम उभे आहेत हे दाखवून देण्यासाठी कामोठे प्रवासीवर्ग रविवारी कामोठे पोलीस ठाण्यात कफच्या माध्यमातून एकवटणार आहे. कामोठेमध्ये सुरू केलेली ही बस आमच्या हक्काची व सोयीची असून आम्ही एनएमएमटी व पोलीस प्रशासनाच्या पाठीशी आहोत, यासाठी चला एक होऊ या..असे निवेदन प्रवासी वर्गाच्या वतीने कफने पोलिसांना दिल्याची माहिती कफच्या वतीने अरुण भिसे यांनी दिली. रविवारी सकाळी ११ वाजता कामोठे पोलीस ठाण्यासमोर सर्व प्रवाशांना जमण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.