अमली पदार्थाविरोधात जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी शाखेने गुरुवारी अभिनव प्रयोग केला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे गट तयार करून एकाच दिवसात साडेचार हजार घरांमध्ये जाऊन अमली पदार्थासंदर्भात जनजागृती केली.
अमली पदार्थाचे व्यवहार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी शाखेने कंबर कसली आहे. या कामासाठी त्यांनी आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले आहे. सर्वसामान्यांना अमली पदार्थाचे धोके समजावेत, त्याबाबत जनजागृती करावी यासाठी शाखेने गुरुवारी एक अभिनव मोहीम आखली. ती म्हणजे एकाच दिवसात साडेचार हजार घरांना भेटी देऊन त्यांना अमली पदार्थाविषयीचे दुष्परिणाम समजावून सांगणे. या मोहिमेबाबत बोलताना अमली पदार्थविरोधी शाखेचे पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही गोवंडीच्या नारायण गुरू महाविद्यालयाची याकामी मदत घेतली. या महाविद्यालयाच्या सहकार्याने एकूण ४० महाविद्यालयांतील १८०० विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले. त्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले. प्रत्येकी ४ मुलांचा एक गट अशा पद्धतीने ४५० गट तयार केले. प्रत्येक गटाने परिसरातील दहा घरांना भेटी दिल्या. कुटुंबातील व्यक्तींना अमली पदार्थाविषयी माहिती, त्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. आणि त्याविषयी जनजागृती केली. या गटाने दिवसभरात साडेचार हजार घरांना भेटी देऊन अमली पदार्थाविषयी जनजागृती केली.
मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) सदानंद दाते यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला. आपल्या खुमासदार भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसन आणि अमली पदार्थापासून दूर राहण्याचा संदेश दिला.
अमली पदार्थविरोधी शाखेने ड्रग्ज फ्री कॅम्पस या मोहिमेअंतर्गत मुंबईतल्या पाच महाविद्यालयांची निवड केली आहे. गोवंडीतील नारायण गुरू महाविद्यालय त्यापैकी एक आहे. या अनोखे अभियानामुळे अमली पदार्थाचा विळखा कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी व्यक्त केला. अमली पदार्थविरोधी शाखेने गेल्या चार महिन्यांपासून विक्रमी कारवाई करून अनेक ड्रग्ज माफियांची पाळेमुळे उद्ध्वस्त केले आहेत.