शहराचे विद्रुपीकरण आणि कधीकधी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास कारक ठरलेले अर्निबध फलक रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्यानंतर आता या विषयावर पोलीस यंत्रणेने असे फलक उभारणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमुख रस्ते व चौकात अपघातांना कारणीभूत ठरतील, या पद्धतीने राजकीय मंडळी वा पक्षांनी अनधिकृत फलक उभारल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे फर्मान पोलीस आयुक्तांनी काढले आहे.
साधारणत: दीड महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाने प्रमुख शहरातीमधील फलक त्वरित काढण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा, महापालिकेने काही फलक काढण्याची कारवाई केली. परंतु, नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे ती मोहीम राहिली. कारण, चार ते पाच दिवसानंतर ही कारवाई नेहमीप्रमाणे थंडावली आणि शहरभर पुन्हा अनधिकृत फलकांचे साम्राज्य उभे राहिले. वास्तविक, न्यायालयाने फलकांवर ज्या राजकीय नेत्यांची छायचित्रे आहेत, त्यांनाही नोटीस बजावण्याचे निर्देश दिले होते. तथापि, पालिकेने त्या दृष्टीने काही कार्यवाही केल्याचे ऐकिवात नाही. शहरात फेरफटका मारल्यावर अनधिकृत फलकांचे कसे पेव फुटले आहे ते सहजपणे लक्षात येते. प्रमुख चौक व रस्ते फलकांच्या जाळ्यात गुरफटल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. राजकीय नेत्यांच्या फलकांविरोधात कारवाई करताना पालिकेची कचखाऊ भूमिका राहिल्याने कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळते. थातुरमातूर फलकांवर कारवाई करण्याचे पालिकेचे धोरण राहिल्याने हा प्रश्न समुळ नष्ट होऊ शकलेला नाही. या पाश्र्वभूमीवर, या विषयात पोलिसांनी लक्ष घातल्याने काहीअंशी चित्र बदलेल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.
शहरात अनधिकृतपणे लावल्या जाणाऱ्या शुभेच्छा फलकांमुळे वाहतुकीस अडथळे होऊन अपघातांची शक्यता असते. असे काही अपघात यापूर्वी घडलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, खासगी इमारती, बांधकाम व रहदारीच्या मार्गावर ठिकठिकाणी राजकीय पक्षांकडून बेकायदेशीर फलक उभारले जातात. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी महापालिकेने परवानगी दिलेल्या जागेव्यतिरिक्त फलकांसाठी अन्य जागांचा वापर केला जाऊ नये अशी सूचना केली आहे. पालिकेने निश्चित केलेल्या जागेवर फलक उभारताना संबंधितांना पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. खासगी इमारती, घरे व बांधकामांच्या ठिकाणीही असे फलक उभारले जाऊ नयेत. रस्ते व सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळे आणणारे फलक उभारले गेल्यास संबंधित व्यक्ती, राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सरंगल यांनी दिला आहे. या अनुषंगाने गुरूवारी पोलीस आयुक्तालयाने अधीसूचना काढली. शहर फलकमुक्त करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. पोलिसांना मदतीला घेऊन पालिकेचा अतिक्रमण विभाग अनधिकृत फलकांविरोधात धडक कारवाई करू शकतो. संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वस्तातील प्रसिद्धीला आपसूक आळा बसू शकतो.