वाहनांची वाढती वर्दळ व त्याकडे वाहतूक पोलिसांच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे लोखंडी पुलाखालील रस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’चे प्रमाण वाढले असून वाहतुकीचा गुंता सोडवण्यास वाहतूक पोलीस उदासीन असल्याचे चित्र आहे.
लोखंडी पूल ते व्हरायटी चौक ही एकमार्गी वाहतूक असल्याने लोखंडी पुलाखालील रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे. मानस चौक व लोखंडी पुलाखाली रोज सायंकाळी ‘ट्रॅफिक जाम’ होत आहे. प्रत्यक्ष परिस्थिती दिसत असूनही त्याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्षच करीत आहेत. बहुतांशी शासकीय कार्यालये सिव्हिल लाईन्सकडे असून तेथून शहराच्या पूर्व व दक्षिण भागाकडे जाणारी बव्हंशी वाहतूक मानस चौकातून जाते. मानस चौकात आनंद टॉकीज, टेकडी व रेल्वे स्थानकाकडून वाहने येतात व लोखंडी पुलाखालून जातात. येथे वाहनांची संख्या प्रचंड असते. पुढे कॉटन मार्केट चौकात वाहतूक सिग्नल्स आहेत. कॉटन मार्केट चौकातील दिव्यांचे टायमिंग इतरवेळी योग्य असले तरी सायंकाळी ते कमी पडत आहे. येथे वाहने थांबली की थेट मानस चौक व मागे टेकडी रोड, रेल्वे स्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. हा गुंता सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून काहीच प्रयत्न होत नाहीत. खोळंब्याची स्थिती रोजची झाली आहे. सायंकाळी कॉटन मार्केट चौकात लोखंडी पुलाकडून महालकडे जाण्यासाठी दिव्यांची वेळ वाढवण्याची गरज आहे. जेणेकरून मानस चौकाकडून जास्तीत वाहने पुढे जाऊ शकतील.
ग्रेट नाग रोड हा शहरातील मार्गापैकी महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरील सरदार पटेल चौकातील दिव्यांचे टायमिंग इतरवेळी योग्य असले तरी सायंकाळी ते कमी पडत आहे. येथे वाहने थांबली की थेट रेल्वे पुलापर्यंत वाहनांची रांग लागते. सायंकाळी पटेल चौकात बैद्यनाथ चौकाकडे जाण्यासाठी दिव्यांची वेळ वाढवण्याची गरज आहे. जेणेकरून मानस चौकाकडून जास्तीत वाहने पुढे जाऊ शकतील. शहरातील वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. प्रत्यक्ष वाहतुकीचा अभ्यास न करता सिग्नल्सचे टायमिंग ठरविले जाते. वाहतूक खोळंबण्यास हेसुद्धा एक कारण आहे. शहरातील प्रत्येक चौकात सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही वेळेतील वाहतुकीचा अभ्यास करून मगच सिग्नल्सचे टायमिंग निश्चित करून मगच त्यानुसार अंमलबजावणी करण्याची गरज आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी जरूर कारवाई करावी. मात्र, पोलिसांनी जबाबदारीचेही भान ठेवले पाहिजे, अशी नागरिकांची इच्छा आहे.