पोलिसांचा वचक नसल्याने तालुक्यातील घोटी शहरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर कोण ते स्पष्ट होऊनही तपास करण्यात पोलिसांनी निष्क्रियता दाखविल्याने महिनाभरात दहा दुकाने फोडण्याचे प्रकार घडले आहेत. पोलिसांच्या भूमिकेविरोधात घोटीकरांनी नाराजी व्यक्त केली असून जिल्हा पोलीसप्रमुखांनी याप्रकरणी लक्ष देण्याची मागणी होत आहे. तालुक्यात अशी स्थिती असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्येही चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून सिन्नर, निफाड तालुक्यात तर अनेक गावांमध्ये युवकांचे गट रात्रीचा पहारा देऊ लागले आहेत.
काही दिवसांपूर्वी घोटीतील एका औषध दुकानात चोरी झाली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी उघडकीस आली असताना आणि चोरटय़ास संबंधित हवालदार ओळखत असतानाही चोरटय़ाला अटक करण्यासाठी कोणताही उत्साह दाखविला नाही. नंतर या चोरटय़ांनी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दोन दुकानांमधील माल लंपास करून पोलिसांनाच आव्हान दिले. तरीही संबंधित हवालदाराने या चोरीचा तपास आपल्याकडे नसल्याचे सांगत हात झटकले. शहरात चोरटय़ांनी थैमान घातले असताना हवालदाराच्या या भूमिकेविषयी नागरिकांमध्येच संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित चोरटय़ास अभय देण्यामागे पोलिसांचा कोणता हेतू आहे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे. पोलिसांनी माल वाहतूक करणारी दोन वाहने आणि माल विकत घेणाऱ्या एका राजकीय पदाधिकाऱ्याला ताब्यात घेऊनही राजकीय दबाव आणि अर्थकारण यामुळे संशयिताला अभय देण्यात आले. या सर्व घडामोडींमुळे पोलिसांची प्रतिमा वाईट होत असून जिल्हा पोलीसप्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
घोटीतील एका चोरटय़ाकडे पोलीस दुर्लक्ष करत असताना घोटीतील व्यापाऱ्याच्या खंबाळे येथील गोदामातून दोन महिन्यांपूर्वी चोरीस गेलेल्या सरकी ढेपच्या २६० गोण्यांपैकी १३६ गोण्या जप्त करण्यात घोटी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून अद्याप निम्म्या गोण्या जप्त करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
घोटी येथील पशुखाद्य ढेपचे व्यापारी महावीर चोरडिया यांच्या मालकीचे खंबाळे शिवारात गोदाम आहे. गोदामात एक हजार ३६० ढेपच्या गोण्या होत्या. अनंतचतुर्थीच्या दोन दिवस आधी चोरटय़ांनी हे गोदाम फोडून २६० गोण्या लंपास केल्या. बाजार भावाप्रमाणे या गोण्यांची किंमत दोन लाख ८६ हजार रुपये होती. त्यावेळी चोरडिया यांचे वडील आजारी असल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार देण्यास विलंब केला. पोलिसांनी खंबाळे येथील सागर पढेर आणि किरण चौधरी या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचा उलगडा झाला. पोलिसांनी १३५ गोण्या हस्तगतही केल्या. संशयितांकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरीजवळील सिन्नर तालुक्यातही कायदा व सुव्यवस्था डळमळीत झाली आहे. ग्रामीण भागात चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे ग्रामस्थ आता गटागटाने रात्रीचा पहारा देऊ लागले असून रात्री नऊनंतर गावाजवळील रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहने अडवून चौकशी करण्यात येऊ लागली आहे. ग्रामस्थांच्या या जागरूकतेचा फटका पाहुण्यांनाही बसू लागण्याचे प्रकार होत आहेत.