जुन्या कारविक्रीच्या व्यवहारातून जमा झालेली सुमारे दोन लाख ३१,१५० रुपयांची रोकड कर्मचाऱ्यांनी चोरून नेल्याच्या संशयावरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी येथील कलानगरमध्ये राहणारे आशुतोष निमसे व ओंकार सांगळे यांचे चोपडा लॉन्सजवळ साईसिद्धी नावाचा कार मॉल आहे. या ठिकाणी जुन्या कार विक्रीचा व्यवसाय केला जातो. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता निमसे व त्यांचे मित्र सुनील जाधव पखाल रोड येथे गाडीचे काम करण्यासाठी गेले होते. काम करून परत आल्यावर निमसे मित्रासह व कर्मचारी भूषण मोरे कार्यालयात बसले होते. दिवसभरातील व्यवसायाची रक्कम सुनील जाधव, जगताप व निमसे यांनी मोजली. दोन लाख ७१,१५० रुपयांचे बंडल तयार करून कापडी पिशवीत भरले. त्यामध्ये एक लाख १४ हजारांच्या ११४ नोटा, ५०० रुपयांच्या १३२ नोटा, शंभरच्या ४११ नोटा, ५०च्या १० नोटांचा समावेश होता. ही पिशवी मालक निमसे व सांगळे यांच्या टेबलावर ठेवत मोरे याला पिशवीकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. रात्री नऊच्या सुमारास निमसे व त्यांचे सहकारी यांनी कार्यालयाच्या मोकळ्या जागेत भोजन केले. घराकडे जात असतांना ही पिशवी कारमध्ये ठेवली. घरी आल्यानंतर पिशवी पाहिली असता त्यात केवळ १० हजार २५१ रुपये असल्याचे आढळून आले. याबाबत निमसे यांनी भूषण मोरे, अनिल पाटील, सुधीर पठाडे, योगेश गाढिया या संशयिताविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.