केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तक्षेपानंतर गुंडगिरी मोडून काढण्यास अपयशी ठरलेले जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी.एन. भटकर यांची अखेर बदली करण्यात आली. भटकर यांना नागपूर शहर पोलीस नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे.
शहरात गुंडगिरी वाढत असल्याची नागरिकांची ओरड असताना त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त मात्र कुठल्याच हालचाली करताना दिसत नाही. त्यामुळे नागपूरकरांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे घालावे लागत आहे.
जरीपटका परिसरात १६ ऑक्टोबरला कथित बुकी पुरुषोत्तम बत्रा यांची हत्या झाली होती. या हत्याकांडानंतर या भागातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला. काहींनी हत्येचा आरोप असलेले कथित बुकी आरीफ यांचे दुकाने जाळले. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी लाठीहल्ला केला. यामध्ये अनेकजण जखमी झाले. पोलिसांनी घरात घुसून विनाकारण महिलांना मारहाण केल्याचा आरोप येथील नागरिकांचा आहे. तसेच जरीपटका पोलीस ठाण्याचे ठाणेदार भटकर या भागातील गुंडगिरी मोडून काढण्यात अपयशी ठरले आहे. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढली असून, असामाजिक तत्त्वाची दहशत निर्माण झाली आहे, अशी तक्रार जरीपटकामधील नागरिकांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. गडकरी दिल्लीला असताना माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांनी दूरध्वनीवरून झाला प्रकार कथन केला आणि भटकर यांच्या बडतर्फीची मागणी केली. मी २१ ऑक्टोबरला नागपूर असून, त्यावेळी भेटण्यास गडकरी यांनी आर्य यांना सांगितले. आर्य यांनी मंगळवारी जरीपटकातील सुमारे दीडशे ते दोनशे महिलांचा मोर्चा गडकरी यांच्या घरी नेला. गडकरी नागपूर विमानतळावर उतरण्याआधीच मोर्चा त्यांच्या वाडय़ासमोर पोहोचला. मोर्चेकरी महिलांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर ठाणेदाराच्या बदलीचे आश्वासन दिले. मोर्चेकरी सायंकाळी ५ वाजता गडकरींना भेटले आणि पोलीस निरीक्षक भटकर यांना बदलीचा आदेश सायंकाळी ७ वाजता पोहोचला. भटकर यांची बदली शहर पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याचा प्रभार बी.पी. सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.
जरीपटका भागात गुंड प्रवृत्तीच्या काही युवकांनी एक संघटना स्थापन केली असून, त्यामार्फत हप्ता वसुली, बिल्डरसाठी जमिनी बळकावणे, घर खाली करून देणे तसेच विविध अवैध धंदे सुरू आहेत. पुरुषोत्तम बत्राच्या मारेकरी आणि इतर स्थानिक गुंडाविरुद्ध मोक्का लावण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.