‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी गत या वेळी जागोजागी फटाक्यांचे हंगामी स्टॉल लावणाऱ्या दुकानदारांची झाली असून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, मतदानत्सोव लागोपाठ पार पडल्याने या दुकानदारांना लागणारे पोलिसांचे परवाने देण्यास उशीर झाला. त्यामुळे अवेळी पडलेल्या पावसाने चार दिवसांत चांदी करणाऱ्या व्यवसायावर पाणी फेरल्याने या वेळी संधी असून या स्टॉलधारकांना चांगला व्यवसाय करता आला नसल्याने पावसाने झोडपले आणि पोलीसदादाने मारले तर दाद मागायची कोणाकडे, अशी स्थिती या हंगामी फटाके स्टॉलधारकांची झाली आहे. विशेष म्हणजे या व्यवसायात मराठी टक्का जास्त आहे. वर्षांतून एकदा हा स्टॉल लावून दिवाळी साजरी करणारे अनेक जण मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरी भागांत दिसून येतात. यंदा मात्र पोलिसांच्या मागे गणेशोत्सवापासून लागलेले बंदोबस्ताचे शुक्लकाष्ठ या रविवारी खऱ्या अर्थाने संपुष्टात आले. त्यामुळे पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस हातात दंडुका घेऊन बंदोबस्ताच्या कामात उतरले असल्याचे दृश्य होते. अखेर विधानसभेचे निकाल घोषित झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यामुळे दिवाळीपूर्वी काही दिवस फटाके दुकानांना परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता. ऐरोली येथील २२ फटाके दुकानांना सोमवारी परवानगी देण्यात आली. फटाक्यांची ही दुकाने सुरक्षेच्या कारणास्तव कुठेही न लावता एकाच मोकळ्या ठिकाणी लावण्याचे आदेश पोलिसांचे आहेत. या वर्षी ही परवानगी उशिरा मिळाल्याने फाटके दुकानदारांचे फार मोठे नुकसान झाल्याची माहिती ऐरोली येथील एका स्टॉलधारकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या स्टॉलधारकांच्या संघटनेने १३ दिवसांपूर्वी परवानगीसाठी कागदपत्रे दिली होती, पण आज या, उद्या या असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली. साहेब बंदोबस्ताला आहेत हे कारण नेहमीचेच झाले होते. त्यामुळे हे स्टॉलधारक दसऱ्यानंतर फाटक्यांचे दुकान लावू शकले नाहीत. त्यामुळे लाखो रुपयांचा धंदा बुडाला. यात पोलिसांना ‘लक्ष्मी बार’ दिल्याशिवाय पान हलत नव्हते. या स्टॉलसाठी लागणारी अग्निशमन दल, पालिका यांची ना हरकत प्रमाणपत्रे सोबत जोडूनही पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामागे बंदोबस्ताचे कारण सांगितले जात होते.  पोलिसांच्या या आडकाठीबरोबरच अवकाळी पावसाने अनेक वेळा या फटाक्यांवर पाणी फेरले. संध्याकाळी काही भागांतच पडणाऱ्या पावसाने या स्टॉलधारकांचे या वर्षांचे गणित कोलमडून गेले. त्यामुळे पावसाने झोडपले आणि पोलिसाने मारले तर दाद मागायची कोणाकडे, अशी स्थिती या फटाके स्टॉलधारकांची झाली आहे.