शहरामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही नाकाबंदी अधिक वाढविण्यात आली असताना, दिवसाढवळ्या दागिने हिसकावण्याच्या घटना सुरूच आहेत. गेल्या तीन दिवसांत चोरटय़ांनी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तब्बल तीन लाखांचे दागिने हिसकावून नेले आहेत.
वाशी सेक्टर १५ येथील मराठा भवनजवळ रिक्षात बसलेल्या अंजली गोळे (४५) यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी हिसकावून पळ काढला. नेरुळ सेक्टर १८ येथील साईबाबा मंदिराजवळील रस्त्याने पायी चालणाऱ्या सरिता इंदुलकर (५७) यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरटय़ांनी हिसकावून पळ काढला आहे. याचप्रमाणे करावे गावात राहणाऱ्या ज्योती सावंत (३२) या सानपाडा सेक्टर ३० येथील सव्‍‌र्हिस रोडने पायी येत असताना चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ६५ हजारांचे दागिने हिसकावून पळ काढला. याच पद्धतीने खांदा कॉलनी येथे तृप्ती गवस (३२) या साई प्रसाद हॉटेलसमोरून पायी येत असताना त्यांच्या गळ्यातील ७२ हजारांचे दागिने चोरटय़ांनी हिसकावून नेले.
वाशी सेक्टर २ येथे उषा भोसले (६१) या त्यांच्या पतीसोबत चालत जात असताना मोटार सायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून नेले. सोनसाखळी चोरीच्या दर दिवसाला किमान तीन ते चार गुन्हे दाखल होत आहेत. शहरात प्रत्येक मुख्य रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी असते. या ठिकाणी वाहन तपासणी केली जाते. मात्र असे असतानाही चोरटे दागिने हिसकावून पळ काढण्यात यशस्वी ठरत आहेत. या नाकाबंदीचा उपयोग काय, असा सवाल महिला वर्ग उपस्थित करीत आहे.