पूर्ववैमनस्यातून उडालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी दोन्ही गटातील ११ जणांविरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गटाने दिलेल्या तक्रारीत कुटुंबियांना मारहाण करून विनयभंग झाल्याची तर दुसऱ्या गटाने मारहाणीवेळी २८ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास झाल्याची तक्रार
दिली आहे.
पेठ रस्त्यावरील नवनाथनगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी मंगल मंजुळे यांनी तक्रार दिली. आपल्या घरासमोर अक्षय चव्हाण पाणी टाकून चिखल करत होता. मुलगा विक्री त्यास समजाविण्यास गेला असता अक्षय व दत्तात्रय चव्हाण यांनी त्याच्यासह पतीला मारहाण केली. पदर खेचून विनयभंगही केला. यावेळी अजय चव्हाणने आपल्या गळ्यातील एक तोळे वजनाची सोन्याची चेन खेचून पळ काढला. या तक्रारीवरून पोलिसांनी दत्तात्रय, अजय व अक्षय या चव्हाण कुटुंबातील तीन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. चव्हाण गटानेही मंजुळे कुटुंबियांविरुध्द तक्रार दिली. आपला मुलगा घरी येत असताना विकी मंजुळे व किरण कुमावत यांनी तुझ्या भावाला जसे संपविले तसे तुला संपवू, वडिलांनी आमच्याविरुध्द केलेला दावा मागे घे, असे धमकावत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हॉकीस्टीकचाही वापर करण्यात आला. वाद सोडविण्यास आपण गेलो असता कोणीतरी २८ ग्रॅम वजनाची अंगठी व चेन खेचून पलायन केले, असे दत्तात्रय चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी विकी मंजुळे, किरण कुमावत, राजु मंजुळे, अशोक कुमावत, मंगलाताई मंजुळे, सविता कुमावत, गणेश धोत्रे व सुनील धोत्रे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धुमश्चक्रीची
माहिती समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.