‘खाली दिमाग शैतान का घर’ अशी हिंदी म्हण आहे. ज्याच्याकडे काहीच कामधंदा नसतो त्यांच्या मनात ‘सैतान’ म्हणजे वाईट विचार येतात असा त्याचा अर्थ आहे. अशी ‘खाली दिमाग’ म्हणजेच कामधंदा नसलेल्या तरुणांची पावले गुन्हेगारीकडे वळू शकतात. हे लक्षात घेऊनच आता मुंबई पोलिसांनी या बेरोजगार तरुणांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सध्या एकंदरीतच सुशिक्षित तरुणांची पावले गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत. ज्यांना गुन्हेगारी पाश्र्वभूमी नाही, ज्यांनी या पूर्वी कधी गुन्हे केलेले नाहीत असे तरूण गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यामुळे एखादा गुन्हा घडल्यावर अशा तरुणांना शोधणे पोलिसांसमोरही मोठे आव्हान असते. त्यामुळे अशा (संभाव्य) गुन्हेगारांना आधीच शोधून त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. एखाद्याकडे उत्पन्नाचे साधन नसतानाही त्याच्याकडे पैसा येत असेल, महागडय़ा गाडय़ांतून तो फिरत असेल अशा तरुणांवर पोलिसांचे यापुढे खास लक्ष असणार आहे. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीतील अशा तरुणांची यादी बनविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण साळुंखे यांनी सांगितले की, बऱ्याच वेळेला कामधंदा नसलेल्या तरुणांकडेअचानक पैसा येतो. ते महागडय़ा मोटारसायकलीवर फिरू लागतात, हॉटेलात जाऊन मौजमजा करू लागतात. तेव्हाच जर त्यांची चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतात. अशी तरूण मंडळी छेडछाडीपासून अनेक छोटेमोठे गुन्हे करीत असतात. यामुळे पोलीस यापुढे असे तरूण कुणाला भेटतात, काय करतात यावर ‘गुपचूप’ नजर ठेवणार आहेत. ते अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडले आहेत  का यावरही नजर ठेवली जाणार आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी मंगळवारी याबाबत सांगितले की यामुळे केवळ महिलांविरोधीच नव्हे तर एकूणच गुन्हेगारीला आळा बसू शकेल.  

’ झोपडपट्टय़ांत राहणाऱ्या तरुणांवर खास नजर असणार आहे. श्रीमंत घरातील मुले बेरोजगार असली तरी त्यांच्याकडे पैसा असतो. पण झोपडपट्टय़ांतील तरुणांकडे पैसा येण्याचा अधिकृत स्रोत नसतानाही त्याच्याकडे पैसे येत असतील तर तो पोलिसांच्या यादीमध्ये येईल. यादी बनविल्यावर या तरुणांची अधूनमधून चौकशी केली जाईल. तसेच त्या परिसरात एखादा छोटामोठा गुन्हा घडला तरी त्या परिसरातील तरुणांची चौकशी केली जाणार आहे.
’  पोलिसांकडे नाव गेले आहे आणि त्यांची आपल्यावर नजर आहे, असे समजल्यानंतर हे तरूण बिचकून राहतील. त्यामुळे नाक्यावरील छेडछाड, छोटय़ामोठय़ा चोऱ्या आदींचे प्रमाण कमी होऊ शकेल, असा विश्वास पोलिसांना वाटतो आहे.

’ पोलिसांवरची नवी जबाबदारी
बेरोजगार तरुणांची यादी बनवून त्यांच्यावर लक्ष ठेवणे हा गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी चांगला उपाय असला तरी त्यामुळे पोलिसांना आणखी काम लागले आहे. आधीच पोलिसांना आपल्या परिसरातील वृद्धांच्या घरी भेटी द्याव्या लागत आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरील मुलांच्याकडून चोरीच्या घटना वाढत असल्याने त्यांच्यावरही लक्ष ठेवावे लागत आहे. रस्त्यावर राहणाऱ्या या मुलांची नोंद करणे, त्यांच्या पालकांना भेटून लहान मुलांना सुरक्षित कसे ठेवायचे त्याचे उपाय समजावणे आदी कामे करावी लागत आहेत. आता बेरोजगार तरुणांची नोंद ठेवण्याच्या नवीन कामाची भर त्यात पडली आहे.