“माझा प्रेमभंग झालाय..जीवनाला कंटाळलोय.. मी आत्महत्या करतोय..”
मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना हा तीन वाक्यांचा ईमेल आला. तो पाठवला होता भूषण बॅनर्जी (नाव बदलले आहे) याने. त्यावेळी दुपारचे अडीच वाजले होते. जीवनाला कंटाळलेला एक तरुण आत्महत्या करायला निघाला होता. त्याने त्यापूर्वी हा मेल खुद्द आयुक्तांना पाठवला होता. हा तरुण कोण? त्याची मनस्थिती काय? तो कुठे राहतो? यातले काहीच माहीत नव्हते. तो मेल खरा की खोटा तेही माहीत नव्हते. पण तरी पोलिसांना तपास करणे आणि जर खराच असा तरुण आत्महत्या करू पाहात असेल तर त्याला वाचवणे आवश्यक होते. त्यामुळे आयुक्तांनी हा मेल लगेच गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे पाठवला आणि त्याला वाचविण्याची जबाबदारी सोपवली. प्रत्येक सेकंद महत्वाचा होता. या तरुणाला शोधून त्याला आत्महत्येपासून रोखण्याचे मोठे दिव्य सायबर सेलच्या अधिकाऱ्यांपुढे होते.
 हा मेल जीमेल या गुगलच्या संकेतस्थळावरून आला होता. त्याचा आयपी अ‍ॅड्रेस शोधून त्याचा पत्ता मिळवावा लागणार होता. पण जीमेलचे सव्‍‌र्हिस प्रोव्हायडर अमेरिकेत आहेत. त्यांच्याशी ईमेलद्वारे संपर्क साधून आयपी अ‍ॅड्रेस मागवणे वेळखाऊ ठरले असते. त्यांनीही तो लगेच दिला असता याची शाश्वती नव्हती. मग सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी थेट अमेरिकेतील सव्‍‌र्हिस प्रोव्हाडयरशी दूरध्वनीवर संपर्क साधून या तरुणाचा आयपी अ‍ॅड्रेस देण्याची विनंती केली. पोलिसांकडे आणखी एक मार्ग होता तो म्हणजे फेसबुकवर ‘भूषण बॅनर्जी’ नावाच्या तरुणाला शोधणे आणि त्याच्याशी संपर्क साधणे. पण जेव्हा सायबर सेलची टीम फेसबुकवर गेली तेव्हा ‘भूषण बॅनर्जी’ नावाचे अनेक तरुण होते. मारिया यांना ईमेल पाठविणारा नेमका भूषण त्यापैकी कोण ते समजत नव्हते. मग तो मार्गही सोडून द्यावा लागला. जी मेलच्या सव्‍‌र्हिस प्रोव्हायडरने काही वेळात आयपी अ‍ॅड्रेस दिला. तो भांडुप येथील एका महिलेचा होता. पोलिसांनी त्वरित त्या महिलेशी संपर्क साधला. ती महिला भूषणची आई होती. भूषणला आत्महत्येपासून रोखण्यासाठी पोलिसांनी त्वरित तेथे पोहोचणे गरजेचे होते. सायबर सेलच्या क्रॉफर्ड मार्केटमधील कार्यालयातून गाडीने भांडुप गाठायला वेळ लागला असता. त्यामुळे अधिकाऱ्यांचे एक पथक उपनगरी गाडीने भांडुपला थडकले. भूषण आत्महत्या करायला जातोय, हे जेव्हा भूषणच्या आईला पोलिसांकडून समजले तेव्हा तिच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यावेळी भूषण आपल्या शयनकक्षात होता. अवघ्या तीन तासांत म्हणजे सुमारे साडेपाच वाजता पोलीस त्याच्या घरी पोहोचले आणि पुढचा अनर्थ टळला. पोलिसांनी भूषणची समजूत काढली आणि त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले.
 २६ वर्षीय भूषण हा संगणक अभियंता आहे. त्याचे एका मुलीवर तीन वर्षांपासून प्रेम होते. मात्र प्रेमभंग झाल्याने तो निराश होता. हे त्याच्या कुटुंबियांनाही माहीत होते. मात्र तो कधी आत्महत्येचा विचार करील, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. त्याला सहज इंटरनेटवर मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ दिसले आणि त्याने कसलाही विचार न करता तो मेल पोलीस आयुक्तांना पाठवला. मित्रांना मेल पाठवला असता तर त्यांनी मला रोखले असते पण पोलीस कधी येतील असे वाटलेच नव्हते, असे भूषणने सांगितले. भूषण आता निराशेच्या गर्तेतून बाहेर आला असून मुंबई पोलिसांचे आभार मानतोय. भूषणच्या पालकांनी तर पोलिसांचे अक्षरश: पायच धरले होते.
सहपोलीस आयुक्त सदानंद दाते (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस सचिन पुराणिक आणि प्रकाश वाळके यांच्या पथकाने या तरुणाला शोधून त्याचा जीव वाचविण्याचे काम अवघ्या तीन तासांत पार पाडले.
.. विद्यार्थिनीचाही जीव वाचवला होता
गेल्या वर्षी बारावीत शिकणाऱ्या नेहा (नाव बदललेले) या विद्यार्थिनीने एका दैनिकास असाच मेल पाठवला होता. बारावीचे पेपर कठीण गेले असल्याने नापास होणार असल्याने मी आत्महत्या करतेय, असे तिने मेल मध्ये लिहिले होते. त्या दैनिकाच्या संपादकाने त्वरित तो मेल पोलीस आयुक्तांकडे दिला होता. त्यावेळी सुद्धा सायबर सेलचे पथक अशाच पद्धतीने तिचा आयपी अ‍ॅड्रेस शोधून त्या मुलीचा घरचा पत्ता काढून तिच्यापर्यंत पोहोचले होते. नेहा डोंबिवलीत रहात होती. पोलिसांनी त्यावेळी सुद्धा तिचे समुपदेशन करून तिला आत्महत्येपासून रोखले होते. विशेष म्हणजे नापास होण्याच्या भीतीने जी नेहा आत्महत्या करायला जात होती ती चक्क ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली