शहरातील मध्यवर्ती भागात वाहतुकीचा होणारा खोळंबा टाळण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक विभागाने सीबीएस ते मेहेर चौक रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी करण्यास मज्जाव केल्यानंतर दोन दिवस मोकळा श्वास घेणारा हा परिसर पोलीस पहारा हटल्यानंतर पुन्हा जैसे थे झाला. यावर ‘लोकसत्ता – नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर पोलीस यंत्रणा मंगळवारी पुन्हा सक्रिय झाली आणि अनधिकृतपणे वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला. पोलीस यंत्रणा तैनात असताना मोकळा श्वास घेणारा हा परिसर पुढील किती काळ या स्थितीत राहणार असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.
शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यावर मध्यवर्ती बसस्थानक , न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय व शाळा-महाविद्यालये आहेत. या ठिकाणी दोन शाळा, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, गृहरक्षक दलाचे जिल्हास्तरीय कार्यालय देखील आहे. न्यायालय तसेच मध्यवर्ती बसस्थानकामुळे असंख्य माणसांची सातत्याने ये-जा सुरू असते. जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील रस्त्यावर वाहनधारक आपली वाहने अनधिकृतपणे उभी करत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. थांब्यावर बसला उभे राहण्यासाठी जागा राहिली नाही. परिणामी, त्या रस्त्यावर थांबून सीबीएस ते मेहेर सिग्नल दरम्यानच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत होत्या. या शिवाय, खाद्य पदार्थ विक्रेत्यांची परिसरात गर्दी होते. रिक्षावाले रस्त्याच्या मधोमध उभे राहून प्रवाशांची ने-आण करत असतात. यामुळे एकंदरीत या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत राहतो. या पाश्र्वभूमीवर, वाहतूक पोलीस शाखेने हा संपुर्ण परिसर दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांसाठी बंद ठेवला. न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनधिकृतपणे वाहने उभी केली जाऊ नयेत म्हणून लोखंडी जाळ्या, दोरखंड, ‘नो पार्किंग’चे फलक लावून पोलीस यंत्रणेने तळ ठोकला. वाहनधारकांना परिसरात वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यावरून काही वाहनधारकांची त्यांचे खटके उडाले. या कारवाईमुळे सलग दोन दिवस मोकळा राहिलेला परिसर सोमवारी पोलीस पहारा हटल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखा बनला. ठिकठिकाणी नेहमीप्रमाणे वाहने उभी करण्यात आली. पोलीस नसल्याने ‘नो पार्किंग’ फलकांकडेही वाहनधारकांनी दुर्लक्ष केले. यामुळे मार्गावर ‘पहिले पाढे पंचावन्न’ची स्थिती निर्माण झाल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्याची दखल घेत मंगळवारी सकाळी वाहतूक पोलिसांनी धाव घेतली.
या परिसरात अनधिकृतपणे वाहने उभी केली जाणार नाही याकडे बारकाईने लक्ष देणे पुन्हा सुरू केले. अनधिकृतपणे वाहने लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. न्यायालयाबाहेर रस्त्यातच थांबणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीचा जाच कमी झाल्याचे पहावयास मिळाले. तथापि, हे आशादायक चित्र किती दिवस कायम राहील याबद्दल नागरिकांना साशंकता आहे.