निवडणुकीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलीस हवालदाराने आज दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही, मात्र आत्महत्या करण्यापूर्वी काही वेळ आधी त्याच्याकडील स्टेनगनमधून गोळीबार झाला होता, मात्र त्यात कोणीही जखमी झाले नव्हते.
अनिल चंद्रकांत वैद्य (वय ४५, रा. अथर्व आपार्टमेंट, चौपाटी कारंजा, नगर) असे या हवालदाराचे नाव आहे, ते पोलीस मुख्यालयात नियुक्तीस होते व त्यांना जुन्या महापालिका कार्यालयात, निवडणुकीच्या मतपेटय़ा तात्पुरत्या स्वरुपात ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘स्ट्राँगरुम’च्या संरक्षणाची डय़ुटी देण्यात आली होती. गेल्या तीन, चार दिवसांपासून ते तेथेच बंदोबस्तास होते.
मिळालेल्या माहितीनुसार वैद्य सकाळी स्टेनगन घेऊन डय़ुटीवर आले, तेव्हा त्यांच्या सहकारी पोलिसांनी स्टेनगन लोडेड असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले, वैद्य यांच्या पवित्र्याने सहकारी पोलिसांनी त्यांच्याकडून स्टेनगन घेण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीत स्टेनगनमधून गोळी उडाली व मनपाच्या कंपाउंडच्या भिंतीला, अग्निशमन दलाच्या बाजूने जाऊन लागली, त्यामध्ये कोणाही जखमी झाले नाही. या घटनेनंतर वैद्य स्टेनगन तेथेच टाकून निघून गेले. नंतर त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे कोतवाली पोलिसांच्या निदर्शनास आले.
स्टेनगन टाकून निघून गेलेले वैद्य थेट घरी गेले, त्यांनी पत्नी व मुलांना बाहेर जाण्यास सांगितले व नंतर त्यांनी साडीच्या सह्य़ाने छताच्या पंख्याला लटकून गळफास घेतला. कोतवाली पोलिसांकडे चौकशी करता, वैद्य यांनी केवळ गळफास घेतल्याची नोंद आहे, अशी माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही गोळी उडालीच नाही, असे सांगताना आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती दिली. वैद्य मूळचे आष्टी (जिल्हा बीड) येथील आहेत.