शहरातील भिकारी आणि गर्दुल्ले यांच्याविरोधातील वाढत्या तक्रारींमुळे माहीम पोलिसांनी अशा भिकाऱ्यांविरोधात तीव्र मोहिम उघडली होती. गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील तब्बल ९७१ भिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. माहीम परिसरात भिकारी आणि नशेकऱ्यांचा त्रास वाढला होता. दर्गा आणि इतर धार्मिक स्थळांजवळ या भिकाऱ्यांचा उपद्रव मोठा होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाईची मोहीम उघडली होती. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत पोलिसांनी तब्बल ९७१ भिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना हटविले आहे. याशिवाय नशापाणी करणाऱ्या १७५ जणांना अटक केली. अमली पदार्थ विकणारे आणि सेवन करणाऱ्यांविरोधात एकूण ६१ गुन्हे गेल्या तीन महिन्यात दाखल केल्याची माहिती माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दस्तगीर मुल्ला यांनी दिली. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मुल्ला म्हणाले.