अमली पदार्थाची तस्करी, पुरवठादार तसेच वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असते. परंतु अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांनाच रोखणे याला आम्ही प्राधान्य दिले असून, त्यामुळे आपसूकच अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्यांना ग्राहकच मिळणार नाहीत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अशा प्रकारच्या कारवाईत दहापट वाढ झाली आहे. पब, रेस्टो-बार, शाळा, महाविद्यालये, मॉल्स तसेच झोपडपट्टी परिसरात अमली पदार्थ सहज उपलब्ध असल्याची माहितीही मिळाली असून, साध्या वेशातील पोलीस त्यासाठी तैनात करण्यात आले आहेत, असे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
अमली पदार्थप्रतिबंधक कारवाईसाठी स्वतंत्र विभाग आहे. या विभागाने अमली पदार्थाचा साठा, पुरवठादार तसेच त्ोस्कर आदींवर कारवाई करणे अपेक्षित असते. त्यानुसार ही कारवाई सुरूच आहे. परंतु त्याचवेळी पहिल्यांदाच सर्व ९३ पोलीस ठाण्यांना अमली पदार्थाचे सेवन करणे, पुरवठादार तसेच तस्कर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपण सूत्रे स्वीकारल्यापासून ही कारवाई सुरू झाली असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा कारवाईत चांगलीच वाढ झाली आहे. अमली पदार्थाचे सेवन करणे कठीण व्हावे असा आमचा प्रयत्न आहे, असेही मारिया यांनी स्पष्ट केले. यामध्ये आम्ही काही प्रमाणात यशस्वी होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
रेल्वे स्थानक, बस स्थानक तसेच झोपडपट्टी परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दुल्ले आढळतात. त्यांच्यावर जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. या गर्दुल्ल्यांकडूनच अनेक गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता असते. महाविद्यालय, शाळेच्या परिसरात अमली पदार्थाचा तसूभरही वावर दिसता कामा नये, असे आमचे प्रयत्न आहेत.
त्यासाठी या युवकांमध्ये मिसळून जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला आहे. ज्यांना यातून बाहेर पडावयाचे आहे त्यांच्यासाठी महापालिकेच्या मदतीने सहा केंद्रेही उभारण्यात आली आहेत, असे मारिया यांनी सांगितले. अमली पदार्थाच्या आहारी जाणाऱ्या तरुण पिढीला रोखण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अमली पदार्थाचे पुरवठादार महाविद्यालये, मॉल्स, पबबाहेर तरुणपिढी लक्ष्य करीत आहेत. अशा धेंडांवर जोरदार कारवाई सुरू आहेच. परंतु अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांनाच त्यापासून परावृत्त करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे या धेंडांचे फावणार नाही
राकेश मारिया, पोलीस आयुक्त

आतापर्यंत कारवाई (कंसात गेल्या वर्षांतील आकडेवारी)
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हे – २०८ (११०);
अटक – २६८ (१४२)
अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी गुन्हे – १० हजार ७१५ (९७९); अटक – १४ हजार ७ (३ हजार ४६७)
एकूण अमली पदार्थ जप्त – ६१६ किलो (३७२ किलो)

सहज उपलब्ध असलेले अमली पदार्थ
चरस, गांजा, हेरॉईन, एलएसडी, अफू, कोकेन, एमडीएमए तसेच एम-कॅट, मेथ.