वाढते अपघात, प्रवासादरम्यान होणारी हाणामारी, चोरटे आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट अशा रेल्वेशी संबंधित नेहमीच्या तक्रारींवर मात करण्यासाठी पोलीस यंत्रणेचे मनुष्यबळ कमी पडत असल्याने, याकामी आता रेल्वे प्रवासी संघटनांची मदत घेण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी घेतला आहे. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुरुवारी रेल्वे प्रवासी संघटना आणि पोलिसांत झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  
उपनगरीय रेल्वेगाडय़ांतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना भुरटय़ा चोरांनी लक्ष्य केले असून, यामुळे रेल्वे अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. बुधवारी रात्रीच कळवा स्थानकात चोरटय़ांच्या हल्ल्यात गायत्री मोहिते ही महिला जखमी झाली होती. या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रवाशांनी तसेच प्रवासी संघटनांच्या सदस्यांनी पोलीस मित्र बनून सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त ए. जी. खान यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत केले. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमानाथ तांबे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि कर्जत या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. फेरीवाल्यांच्या समस्येला तोंड देण्यासाठी रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस यांच्यातील हद्दीची निश्चिती करण्यात यावी आणि फेरीवाल्यांवर नियंत्रण राखावे. छोटय़ा स्थानकातील पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात यावी. रेल्वे रूळ ओलांडण्यास प्रतिबंध करण्याबरोबर रेल्वे रुळांवर प्रवासी येऊ नयेत म्हणून संरक्षण भिंतीची बांधणी करण्यात यावी. त्याच बरोबर सुरक्षा यंत्रणेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावा, अशा सूचना प्रवासी संघटनांनी या वेळी केल्या.

प्रवासी संघटनांसोबत झालेली बैठक सकारात्मक होती. यामुळे प्रवाशांच्या अनेक मागण्या आणि सूचना पोलिसांना समजू शकल्या. रेल्वे स्थानक परिसरातील अपघात आणि गुन्हे घटण्यासाठी पोलिसांबरोबरच प्रवासी संघटनांनी जागरूकपणे मदत करण्याची गरज आहे.
– ए. जी. खान,
लोहमार्ग सहाय्यक पोलीस आयुक्त

रेल्वे पोलिसांच्या वतीने प्रवासी संघटनांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवासी संघटनांच्या वतीने त्यांना सहकार्य राहील. मात्र प्रवाशांच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठीसुद्धा रेल्वे पोलिसांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
– राजेश घनघाव, कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटना