तोतया पोलिसांच्या कथा आपण नेहमीच ऐकतो. पण (खऱ्या) पोलिसांच्या हाती एक अवलिया लागला आहे, त्याने आपल्या तोतयागिरीसाठी खऱ्या पोलिसांनाच कामाला लावले. त्याचे प्रताप ऐकून पोलीसही थक्क झाले आहेत.
निशांत ऊर्फ सन्नी ऊर्फ राहुल परमार (२७) असे या तरुणाचे नाव आहे. परमार मुंबतला सराईत चोर. त्याच्यावर बोरिवली, मालाड, कांदिवली, कस्तुरबा मार्ग, गोरेगाव आदी अनेक पोलीस ठाण्यात तब्बल दोन डझनहून अधिक गुन्ह्य़ांची नोंद आहे. मोबाईल आणि सोनसाखळी चोरणे हा त्याचा मुख्य ‘धंदा’. स्वाभाविकच त्याचा नेहमीच पोलिसांशी संबंध यायचा. तुरुंगात असताना, पोलीस ठाण्यात ये-जा करत असताना त्याने पोलिसांची शैली शिकून घेतली आणि मग आपल्या पुढच्या कामासाठी त्याने याच शैलीचा वापर केला. त्याने खंडणी उकळण्याचे अनेक धंदे चक्क खऱ्या खुऱ्या पोलिसांना पाठवून केले.
पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून तो मुंबईतील सराफांना फोन करत असे. पण सुरुवातीला तो स्थानिक पोलीस ठाण्यात फोन करून पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोलतोय असे सांगायचा. एका सराफाचा पत्ता देऊन तेथे बीट मार्शल पाठवायला सांगायचा. या सराफावर चोरीचा आरोप आहे. मी त्याला पकडायला येतोय. पण पुण्याहून यायला वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही बीट मार्शल पाठवून त्या सराफाला थांबवून ठेवा, असे तो सांगत असे, अशी माहिती खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी दिली.
त्यामुळे बीट मार्शल तेथे पोहोचायचे. खरेखुरे पोलीस दुकानात आले म्हटल्यावर तो सराफही दचकायचा. मग परमार त्या सराफाला फोन करायचा. तू चोरीचे दागिने विकत घेतले आहे. एकाला अटक केली आहे, आता तुलाही अटक करणार. असे सांगून तो मांडवली करत ५० हजार ते १ लाखांची रक्कम मागायचा. मग बीट मार्शलला जायला सांगायचा. नंतर ही रक्कम एका पानवाल्याकडे ठेवायला सांगून काही मुलांना ते पैसे घ्यायला पाठवत असे. त्या मोबदल्यात तो या मुलांना १०० ते ५०० रुपये द्यायचा. सायन येथील कोठारी नावाच्या सराफाला तर त्याने पोलीस निरीक्षक नलावडे यांच्या नावाने अशाच पद्धतीने धमकावले होते. ते प्रकरण खूप गाजले आणि पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली होती.
परमारचा हा धंदा बिनबोभाट सुरू होता. कधीकधी तो बीट मार्शलना दमही द्यायचा, एवढी पोलिसांची शैली त्याने आत्मसात केली होती. कुणालाच त्याचा संशय आला नाही. पण कॅबिनेट मंत्री दत्ता मेघे यांना फसविण्याचा प्रयत्न त्याच्या अंगाशी आला. मेघे यांना फोन करून तुम्हाला अटक करायची आहे, असे सांगून त्याने धमकी दिली. चक्क कॅबिनेट मंत्र्यांला एका पोलिसाने फोन केल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली.
खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख विनायक वत्स यांनी हा तपास आपल्या हाती घेतला. पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, विनायक मेर, विवेक भोसले, जयवंत सकपाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, धोंडीराम बनगर, इश्वरा माने आदींच्या पथकाने या भामटय़ाचा शोध सुरू केला. पाळत ठेवून त्याला अटक केली. त्याच्या जबानीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याने सराफांना तर लुटले. पण खऱ्याखुऱ्या पोलिसांचा त्यासाठी वापर करीत होता हे पोलिसांच्या जिव्हारी लागले आहे.