लोकसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराची मुदत मंगळवारी संध्याकाळी संपली आणि त्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दिली जाणारी विविध प्रलोभने, आमिषे तसेच बाहेरील कार्यकर्त्यांची कुमक रोखण्यासाठी स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचा ‘ऑपरेशन ऑल आउट’ नामक जागता पहारा सुरू झाला. तिन्ही विभागांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मंगळवारी रात्री संपूर्ण ठाणे परिसरावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होते. ड्राय डे असल्याने दारूची दुकाने आणि बिअर बार बंद असल्याची खात्री करून घेतली जात होती. बाहेरून येणाऱ्या सर्व मार्गावर नाकाबंदी करण्यात आली होती.
आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून संध्याकाळी सहाची वाट न पाहता ठिकठिकाणच्या राजकीय कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच राजकीय जाहिरातींचे फलक, होर्डिग्ज काढून टाकण्यात सुरुवात केली होती. त्यामुळे रात्री जादूची कांडी फिरावी तसा रस्त्यांवरील सारा निवडणूक प्रचार पूर्णपणे गायब झालेला दिसून येत होता. गेले १५ दिवस जळी, काष्ठी, पाषाणी दिसणाऱ्या उमेदवारांच्या छब्या कुठे औषधालाही दिसत नव्हत्या. उचलून नेता न येणारे जाहिरात फलक झाकून टाकलेले दिसत होते. दोन दिवसांनी येणाऱ्या निवडणुकांच्या परीक्षेचे कोणतेही टेन्शन न घेता सारे ठाणे रात्री साडेदहालाच चिडीचूप झाले होते. मुंब्रा परिसरात मात्र रात्री उशिरापर्यंत जाग होती. गुरुवारी मतदानाच्या दिवशी जेएनपीटी बंदर तसेच नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने मंगळवारी रात्री रस्त्यांवर माल वाहतुकीचे जास्त ट्रक असणार हे गृहीत धरून वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी न होण्याची दक्षता घेत होते. महामार्गावरील अशा ‘ऑल इज वेल’च चित्रावर समाधान न मानता गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी विविध झोपडपट्टय़ांमध्ये ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांची यादी घेऊन फिरत होते. गस्ती फेऱ्यांदरम्यान आढळून येणाऱ्या गाफील बंदोबस्ताची पोलीस अधिकारी खास खाकी पद्धतीने हजेरी घेत होते. वॉकी-टॉकीवरून संबंधितांना योग्य त्या सूचना तसेच आदेश देत होते. रात्रीच्या या मोहिमेत संशयित लॉज तसेच ढाब्यांवरही तपासणी करण्यात आली. एरवी रात्रीच जागा असणारा शीळफाटा परिसर ‘ड्राय डे’ आणि कडेकोट बंदोबस्तामुळे अकराच्या सुमारासच गाढ झोपला होता.