दिवसेंदिवस वाढत चालेल्या सायबर क्राईममुळे नवी मुंबई पोलीस मेटाकुटीस आले आहेत. याला आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून असुरक्षित असणाऱ्या वाय-फायवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सात पथकांची नियुक्ती केली आहे. हे पथक गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवणार आहे. नवी मुंबई वाय-फाय क्राईममुक्त करण्याची विशेष मोहीम नवी मुंबई पोलिसांनी हाती घेतली आहे. वाय-फाय नेटचा समाजविघातक शक्ती दुरुपयोग करीत असल्याने त्यांचा पासवर्ड कोड सीक्रेट ठेवण्याचे आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्त के.एल.प्रसाद यांनी केले आहे. घर, रेल्वे स्थानक, मॉल, आयटी पार्क, महाविद्यालय आदी ठिकाणी वायफायचा वापर केला जातो. या भागात पोलिसांकडून सर्चिग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी वायफाय, इंटरनेट, फील्डमधील नामवंत टीमबरोबर घेतली असून सात पथके स्थापन केली आहे. ही टीम स्वत:जवळ असलेल्या लॅपटॉप, मोबाइल यांना वाय-फाय कनेक्टर होत आहे का यांची तपासणी करणार आहे. ज्याचे वाय-फाय विनापासवर्ड कनेक्ट होईल, त्याचा आयपी अ‍ॅड्रिस काढून संबंधिताना नोटीस पाठवली जाणार असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. त्यांनतर सिक्युरिटी कोड टाकण्यासाठी बंधनकारक केले जाणार असून यांनतरही जर कोणी सिक्युरिटी कोडशिवाय वाय-फाय नेट वापरत असेल तर त्यांच्यावर सायबर क्राईम कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे मेंगडे यांनी सांगितले.