बाल गोविंदांबाबत घेतलेल्या निर्णयावर बालहक्क संरक्षण आयोग ठाम असून आता कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याची भूमिका आयोगाने घेतली आहे. आयोगाने ताठर भूमिका घेतली असतानाच गोविंदा पथकेही त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याने पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. काही गोविंदा पथकांनी दहीहंडीच्या दिवशी नव्हे तर नारळी पौर्णिमेलाच बाल गोविदांचे थर रचण्याचा निर्धार केला आहे.
बाल हक्क संरक्षण आयोगाने बाल गोविंदांवर बंदी घातल्याने गोविंदा पथकांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. बाल गोविंदांना दहीहंडी फोडता यावी यासाठी मोठय़ा पथकांची धडपड सुरू आहे. सर्वात उंच दहीहंडी फोडण्याचा मान मिळविण्यासाठी याच पथकांना बाल गोविंदांची अधिक आवश्यकता भासते. गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेली पथकांमधील चुरस बाल गोविंदांना भोवली आहे. आयोगाने आपल्या आदेशावर ठाम राहात पोलिसांकडे अंगुलीनिर्देश केले आहे. त्यामुळे आता पोलीस काय करतात याकडे समस्त गोविंदा पथकांचे लक्ष लागले आहे. गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी वरच्या थरांवर तीन वर्षांपासून १२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा वापर केला जातो. थर कोसळून ही मुले जखमी होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे १२ वर्षांखालील मुलांचा दहीहंडी फोडण्यासाठी वापर करण्यावर बाल हक्क संरक्षण आयोगाने र्निबध घातले. मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने लहान-मोठी गोविंदा पथके आहेत. मात्र, दहीहंडीच्याच दिवशी नव्हे तर नारळी पौर्णिमेच्या दिवशीही बाल गोविंदाच दहीहंडी फोडतील अशी भूमिका काही मोजक्या मोठय़ा गोविंदा पथकांनी घेतली आहे. त्यात काही महिला गोविंदा पथकांचाही समावेश आहे. असे असले तरी गल्लीबोळातील छोटय़ा पथकांचे प्रमुख मात्र अद्यापही धास्तावले आहेत. उत्सवाच्या दिवशी नसती आफत नको म्हणून ते १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सर्वमान्य तोडगा निघेल – अहिर
बाल गोविंदांवरील बंदीमुळे निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यासाठी वर्षां गायकवाड यांच्याबरोबर शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतून सर्वमान्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा गृहनिर्माण राज्यमंत्री आणि दहीहंडी उत्सवाचे आयोजक सचिन अहिर यांनी व्यक्त केली.

दहीहंडी फोडण्यासाठी रचल्या जाणाऱ्या थरांमध्ये बाल गोविंदांचा वापर होत असल्यास पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश बाल हक्क संरक्षण आयोगाने दिले आहेत आणि या निर्णयावर आयोग ठाम आहे. बाल गोविंदांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी आता पोलिसांची आहे.
-उज्वल उके, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग