नवी मुंबई पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर लोकसभा, विधानसभा निवडणुकांत घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या विरोधकांनीही घराणेशाहीला खतपाणी घातले असून, नाईकांचीच री ओढली असल्याचे दिसून येते. पालिकेच्या या निवडणुकीत जिकडे तिकडे चोहीकडे सर्वपक्षीय घराणेशाहीचे चौघडे वाजत असल्याचे दिसून येणार आहे. उमेदवारी वाटपाचा कार्यक्रम अद्याप दूर असला, तरी या घराणेशाहीच्या दीपकांनी प्रभागात ‘दिवे’ लावण्यास सुरुवात केली आहे. काही नगरसेवकांनी तर प्रभागांचे ‘सातबारा’ आपल्याच नावावर असल्याचे जाहीर केले आहे.
नवी मुंबई पालिकेची निवडणूक २२ एप्रिल  रोजी होत आहे. ३१ मार्चपासून आठ दिवस उमेदवारी अर्ज वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यासाठी सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांनी स्वत:, पत्नी, मुलगा, मुलगी आणि भावजय यांना उमेदवारी मागण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी यांना आपल्या नातेवाईकांसाठी तीन जागा हव्या असून, त्यांना त्यांच्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवायचे आहे. त्यासाठी त्यांनी एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेना प्रवेश केला आहे. त्यानंतर कोपरखैरणे येथील नगरसेवक शिवराम पाटील यांनाही पुन्हा त्यांच्या पत्नी अनिता यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे. वाशीतील अनेक प्रभाग महिला आरक्षित झाल्याने पत्नीसाठी उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या समोर माजी उपमहापौर भरत नखाते यांनी पत्नीला उतरवण्याचे ठरविले आहे. वाशी गावात काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांना तीन ठिकाणी उमेदवारी हवी असून त्यात त्यांच्या पत्नीसह दोन भावजयांचा समावेश आहे. तुर्भे गावात तर घराणेशाहीचा कळस झाला असून माजी नगरसेवक व काँग्रेस नेते डी. आर. पाटील यांचे चिरंजीव विवेक पाटील, त्यांची मुलगी शुभांगी, दिवगंत भाऊ भोलानाथ पाटील यांची पत्नी शशिकला, त्यांचा मुलगा निशांत हे सर्व निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यानंतर नेरुळमध्ये माजी नगरसेवक संतोष शेट्टी व त्यांच्या पत्नीचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांनी आपला तंबू जवळच्या प्रभागात हलविला असून, त्यांच्या जागी त्यांच्या महिला स्वीय साहाय्यकांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेसमध्ये उमेदवारांचा तुटवडा भासणार असल्याने तीन वेळा हॅटट्रिक साधणारा नगरसेवक सांगले ते धोरण आणि बांधेल ते तोरण अशी स्थिती नवी मुंबईत आहे. याच नेरुळमधील काँग्रेसच्या कंपूशाहीला कंटाळून माजी नगरसेवक नामदेव भगत यांनी दोन महिने अगोदरच काँग्रेसला ठेंगा दाखविल्याने, त्यांनीही शिवसेनेत तीन जागी उमेदवारी मागितली आहे. यात ते व त्यांची पत्नी आणि त्यांच्या बेलापूर येथील विवाहित मुलीचा समावेश आहे. यात बेलापूरचा प्रभाग काँग्रेसच्या अमित पाटील यांच्या ताब्यात असल्याने, त्यांना प्रथम प्राधान्य राहणार असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवी मुंबईला लागलेली घराणेशाहीची कीड दुसऱ्या प्रतिनिधींच्या स्वरूपात चांगलीच फोफावली असून, दिघा ते सीबीडीपर्यंत पती, पत्नी, मुलगा, मुलगी यांचेच राज्य असल्याचे दिसून येणार आहे. विशेष म्हणजे ज्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप झाला, त्या नाईक यांनी निवडणुकीत जवळचा नातेवाईक उतरविणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पालिका सभागृहात यावेळी ‘नाईक’ दिसणार नाहीत. सुशिक्षित, नियोजबद्ध सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातही ही घराणेशाही कायम असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आयुष्यभर झेंडेच हातात घ्यायचे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.