विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याने इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात राजकीय पक्षांचे मेळावे, बैठका यांचे सत्र सुरू झाले असून राज्यातील सत्ताधारी आघाडीविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा उठवीत काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महायुतीने प्रयत्न सुरू केले आहेत. तर लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात केवळ एकटय़ा इगतपुरी विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांना मताधिक्य मिळाल्यामुळे काँग्रेसजनही उत्साहित आहेत.
परंपरागत असा हा काँग्रेसचा बालेकिल्ला. शिवसेना-भाजप युतीने याआधी राजकीय चमत्कार घडवीत दोन वेळा मुसंडी मारली असली तरी पुनर्रचनेत या मतदारसंघाला त्र्यंबकेश्वर तालुका जोडला गेल्याने काँग्रेसने पुन्हा हा मतदारसंघ ताब्यात घेतला.
निवडणुकीचे दिवस आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांचे जनसंपर्क दौरे, गट आणि गटनिहाय कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेण्याचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीचे हेमंत गोडसे यांचा विजय झाल्याने तालुक्यात युतीला सुगीचे दिवस आल्याचे दिसून येते. त्यामुळे युतीकडून इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली असली तरी या मतदारसंघाचे विद्यमान प्रतिनिधित्व काँग्रेसच्या निर्मला गावित करीत असल्याने साहजिकच या मतदारसंघावर आपलेच वर्चस्व असल्याचे काँग्रेसजन मानतात. मागील विधानसभा निवडणुकीत अत्यंत कमी मतांनी पराभवाला सामोरे जावे लागलेल्या मनसेला बदलत्या परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघात पुन्हा एकदा निर्मला गावित यांनाच संधी दिली जाणार हे निश्चित आहे. कोणतीही मोठी सभा झालेली नसताना केवळ परिवर्तनासाठी मतदारांनी काँग्रेसला संधी दिली. आदिवासी राखीव असलेल्या या मतदारसंघात तब्बल १९ उमेदवारांनी आपले नशीब अजमावल्याने मताचे विभाजन होऊन त्याचा फायदा काँग्रेसला झाला होता. काँग्रेसची मतदारसंघावर मदार कायम राहण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून पाच वर्षांच्या कालावधीत अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाचा फायदा काँग्रेसला होईल, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आणि माजी खासदार हे राष्ट्रवादीचे असल्याने या मतदारसंघातही राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. असे असतानाही जागा काँग्रेसकडे असल्याने सुरुवातीपासून राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळत काँग्रेस उमेदवारांचे काम प्रामाणिकपणे केले. दोन पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. परंतु जागा काँग्रेसच्या वाटय़ाला जात असल्याने मागील दोन निवडणुकांत राष्ट्रवादीचे शिवराम झोले यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. उमेदवारीसाठी शिवराम झोले यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असला तरी राष्ट्रवादीने ही जागा आपणास मिळावी म्हणून पुन्हा एकदा आग्रह धरला आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होऊनही त्यांच्या उमेदवारास कोणताही फायदा झाला नाही. मागील विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या या पक्षाने पाच वर्षांच्या कालावधीत विविध आंदोलने करून मतदारसंघातील मतदाराच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्याशिवाय सध्या तरी दुसरा पर्याय दिसत नाही. मोदी लाटेमुळे लोकसभा निवडणुकीत एकहाती बहुमत मिळविण्याचा चमत्कार करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला असल्याने भाजपला उमेदवारी करण्याची संधी मिळालेली नाही. मात्र विद्यमान स्थितीत महायुतीला पूरक वातावरण असल्याने भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळेच ही जागा भाजपला मिळावी, अशी मागणी भाजपकडून होत आहे. महायुतीने ही जागा भाजपला सोडल्यास या जागेवर उमेदवार जिंकून आणण्याची ग्वाही भाजपचे महेश श्रीश्रीमाळ यांनी दिली.
गावित यांच्याआधी सलग दहा वर्षे या मतदारसंघावर भगवा फडकविणाऱ्या शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. माजी आमदार शिवराम झोले, चंद्रकांत खाडे यांच्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक अशोक गुंबाडे हे उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. गुंबाडे यांनी तर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे व संपर्क दौरेही सुरू केले आहेत.