उरणमधील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उरणबाहेरून उरण परिसरात येणाऱ्या व जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली असून, वाहनातून ये-जा करीत असताना कोणत्या दिशेला कोणते ठिकाण आहे. याची माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सिडकोने दिशादर्शक फलक लावलेले आहेत. मात्र या फलकांवर विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी बॅनर लावल्याने दिशादर्शक फलक कायमच त्यामागे झाकलेले असल्याने नवीन वाहनचालकांना रस्ता विचारीत मार्गक्रमण करावे लागत आहे.
न्यायालयाने आदेश दिल्याने मुंबईसह राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील शहराला विद्रूप करणारे बॅनर्स हटविण्यात आले होते. त्यामुळे जनतेकडून न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या म्हणून नाक्या नाक्यांवर सार्वजनिक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात राजकीय पक्षाचे बॅनर झळकू लागले आहेत. याचा मोठा फटका शहरात दाखल होणाऱ्या नवीन वाहनचालकांना होत आहे. दिशादर्शक फकल झाकोळले गेल्याने योग्य दिशा माहीत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच एकदा का बॅनर लावला की तो कार्यक्रम संपल्यानंतरही फाटेपर्यंत कायम असतो. या दिशादर्शक फलकांबरोबरच अनेक ठिकाणी जनतेला आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी काही फलकही लावले असून, उरण परिसरातील आगीची माहिती देण्यासाठी बोकडविरा चार फाटा येथे सिडकोच्या अग्निशमन दलाच्या वतीने दूरध्वनी क्रमांक असलेला फलकही या बॅनरच्या मागे झाकला जात आहे. मागील वर्षी दिशादर्शक फलक नसल्याने राष्ट्रीय महामार्ग ४ ब वरून पुण्याकडून आलेल्या व मुंबईत जाणाऱ्या एका वाहनाचा रस्ता चुकल्याने ते वाहन मुंबईला जाण्याच्या उद्देशाने जेएनपीटी बंदराच्या कंटेनर गेटकडे गेले आणि तेथील वाहतुकीची माहिती नसल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात वाहनातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र या घटनेनंतरदेखील प्रशासनाला जाग आलेली नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे उरण विभागाचे उपअभियंता ए.आर.राजन यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. सिडकोने अत्यावश्यक सेवा म्हणून तसेच दिशादर्शक फलक लावल्यानंतर त्याच्या देखभालीची जबादारीच कोणाला दिली नसल्याची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.