काही हौशी लोकांच्या हातात माईक आला रे आला की त्यांना जाग येते. मग पुढे श्रोता कोण आहे याचे भान त्यांना उरत नाही. असाच काहीसा अनुभव अपंगांसाठी कृत्रिम अवयव आणि साहित्य प्रदान शिबिरात नागपूरकरांना आला. जनतेची नाडी ओळखतो असा टेंभा मिरवणाऱ्या राजकीय नेत्यांना आपण अपंग विद्यार्थ्यांसमोर किती विद्वत्ता पाजळावी याची जाण नसल्याचा अनुभव नागपूरकरांना आला. आपल्याला साहित्य मिळेल आणि जीवन थोडेफार सुखकर होईल. या आशेने दूरवरून आलेल्या अपंगांना नेत्यांच्या लांबलेल्या भाषणामुळे तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार खावा लागला.
पं. दीनदयाल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च अँड ह्य़ुमन रिसोर्सेस आणि केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या संयुक्त मिद्यमाने रेशीमबाग मैदानावर कृत्रिम अवयव तसेच तीन चाकी सायकल प्रदान समारंभ पार पडला. केंद्रीय अपंग विकास मंत्रालयाचा आजवरचा देशातील हे सर्वात मोठे अवयव प्रदान शिबीर असल्याचे सांगण्यात येते. देशातील सर्वात मोठा कार्यक्रम असल्याने या व्यासपीठाचा वापर आपल्या पक्षाचा कार्यक्रम पुढे रेटण्याची संधी सोडेल तो राजकारणी कसला. याच उक्तीला जागून समारंभातील चारही प्रमुख वक्त्यांनी त्यांना हवा तेवढा वेळ घेऊन अंध, अपंगांसमोर अडीच ते तीन तास यथेच्छ भाषणबाजी रंगवली.
जिल्ह्य़ातील काही तालुक्यातील अपंगांना साहित्य आणि अवयव देण्यासाठी अपंगांची आगाऊ नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पुनर्वसन केंद्रात करण्यात आली. कार्यक्रमस्थळी ऐनवेळीदेखील नोंदणी करण्यात आली. नोंदणीला सकाळी साडेनऊ वाजता प्रांरभ झाला. यासाठी सावनेर, कळमेश्वर, काटोल, नरखेड तालुक्यातील अपंगांची गर्दी उसळली होती. सकाळपासून नोंदणी करण्यात येत होती. प्रत्यक्ष कार्यक्रम तब्बल दीड तास विलंबाने सुरू झाला. तरीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यापैकी कुणालाही आपले भाषण आवरते घ्यावेसे वाटले नाही. अपंगांना साहित्य, कृत्रिम अवयव प्रदान आपण करतो म्हणजे नियतीने ज्यांच्यावर अन्याय केला, त्यावर आपण उपकार करतो आहोत असे नव्हे, असे नेत्यांना वारंवार सांगावे लागणे. यातच बरेच काही आले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील अपंगांसाठी केंद्र सरकार आणि इतर संस्थांच्या मदतीने कृत्रिम अवयव, साहित्य प्रदान शिबीर आयोजित केले. कधी नव्हे तो अपंगांसाठी भव्य असा कार्यक्रम घडून आला. उदात्त हेतूने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल कुणाला शंकाही येण्याचे कारण नाही. परंतु भव्यदिव्य सोहळे घेण्यात आघाडीवर असलेल्या नेत्याला कुणासमोर आणि कितीवेळ बोलावे याचे भान नसावे हे अनाकलनीय आहे. त्यातही अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय बाब म्हणजे नेत्यांची भाषणे ओटोपल्याशिवाय अपंगांना साहित्य किंवा अवयव वाटप न करण्याच्या सूचना. आयोजकांनी दिलेल्या या सूचनेमुळे हा कार्यक्रम अपंगांना कृत्रिम अवयव आणि साहित्य वाटपाचा होता की, त्यांच्या गळी राजकीय नेत्यांची भाषणे उतरवण्याचा होता, असा प्रश्न उपस्थित होतो.
नेतेमंडळी नियोजित वेळेपेक्षा विलंबाने आल्याने कार्यक्रम तब्बल दीड तास उशिरा सुरू झाला. त्यानंतर साधारणत अडीच तास भाषणांचा फड रंगला. नरखेड, सावनेर, काटोल, कळमेश्वर तालुक्यांतील अपंग विद्यार्थी नोंदणीसाठी रेशीमबाग मैदानावर सकाळी नऊ वाजतापासून येऊ लागली होती. कार्यक्रम दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू झाला आणि तीन वाजता संपला. सकाळपासून आलेले विद्यार्थी तहान आणि भुकेने व्याकुळ झाली होती. मात्र याची यत्किंचत चिंता आयोजकांमध्ये जाणवत नव्हती. त्याचाच परिणाम अनेक अंध, अपंग शेजारच्या हॉटेलात, चहा टपरीवर तहान-भूक शमवण्याचा प्रयत्न करीत होते. ज्यांच्याजवळ पैसे नाही, त्यांना मात्र मंडपात बसून जेवणाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नव्हता. जेवनाला उशिराने सुरुवात झाली आणि काही क्षणातच अन्नपदार्थ संपल्याने अनेक अपंगांना उपाशी परतावे लागले.
या शिबिरासाठी जिल्ह्य़ातील अपंगांची आगाऊ नोंदणी करण्यात आली. ऐनवेळी आलेल्या अपंगांची देखील नोंदणी करण्यात आली. भाषणाला गर्दी दिसावी म्हणून नोंदणी करण्याचे थांबवण्यात आले. त्यामुळे नंतर नोंदणी आणि साहित्य वाटपासाठी एकच गर्दी उसळली. जिल्हा प्रशासनाकडे अपंग विद्यार्थी आणि इतरांची माहिती उपलब्ध आहे. शिवाय शिबिरासाठी आगाऊ नोंदणी करण्यात आली. त्यामुळे आणखी ऐनवेळी किती लोक येऊ शकतात. याचा अंदाज आयोजकांना नक्कीच बांधता येणे शक्य होते. परंतु ढिसाळ नियोजनाचा फटका अपंगांना बसायचा होतो बसलाच आणि एका चांगल्या उपक्रमांची राजकीय नेत्यांच्या लांबलेल्या भाषणबाजीने वासलात लावली.