गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित होताच आचारसंहिता लागल्याने राज्याचे मंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच यांनी शासकीय वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात परत केली. निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता विदर्भातील विविध मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीला रंगत येणार आहे. नवरात्रीनिमित्त गरबा आणि दुगरेत्सवाची धूम असताना विविध राजकीय पक्षांची रणधुमाळी बघायला मिळणार आहे.
दिवाळीपूर्वी निवडणुका आणि लगेच चार दिवसांनी मतमोजणी असल्याने निवडून येणाऱ्या उमेदवारांना दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. १५ ऑक्टोबरला निवडणुका होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. गेल्या विधानसभा निवडणुका दिवाळीपूवी घेण्यात आल्या होत्या आणि दिवाळीनंतर मतमोजणी झाली होती. निवडणुकांच्या तारखा घोषित होताच आचारसंहिता लागू करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांची शासकीय वाहने परत घेण्यात आली. महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रवीण दटके यांना केवळ पाच दिवस शासकीय गाडीचा लाभ मिळाला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक, रोहयोमंत्री नितीन राऊत यांनी सरकारी वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात परत केली. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेली राजकीय पोस्टर्स आणि हॉर्डिग हटविण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले असून त्याची अंमलबजावणी शहरातील काही भागात करण्यात आली. महापौर प्रवीण दटके यांनी सायंकाळी शासकीय वाहन परत करून दुचाकीने ते फिरले. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय वाहन परत केले. गोतमारे यांचा कार्यकाळ २० ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे त्यांना पद सोडण्याच्या आठ दिवस आधी शासकीय वाहन परत करावे लागले. आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शासकीय वाहने परत करण्यास सुरुवात केली आहे.
विविध राजकीय पक्षांची निवडणुकीच्या दृष्टीने जनसंपर्क कार्यालये स्थापन झाली असून त्यांनी शहरात संपर्क सुरू केला आहे. अंतिम मतदार याद्या तयार झाल्या नसल्या तरी त्याला येत्या काही दिवसात अंतिम रूप देण्यात येईल. विधानसभा निवडणुकांची चाहूल लागताच आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने विविध योजना मंजूर केल्या तर काही योजनांचे भूमिपूजनही केले. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि पारडी पुलाचे भूमिपूजन केले.
राजकीय मोर्चेबांधणीला येत्या दोन-तीन दिवसात वेग येणार आहे. अजूनही महायुती आणि आघाडीमध्ये जागा वाटपाचा सुरू असलेला घोळ बघता उमेदवार जाहीर करायला वेळ लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचाराचा कालावधी हा २० ते २५ दिवसांचा मिळण्याची शक्यता आहे.  येत्या काही दिवसात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे.
विदर्भातील विविध जिल्ह्य़ात उमेदवारांबाबत राजकीय चित्र अजूनही स्पष्ट झाले नसले तरी उमेदवारी मिळेल या आशेने काहींनी प्रचार सुरू केला आहे.

लोकसभा मतदारसंघनिहाय विदर्भातील विधानसभा मतदारसंघ
बुलढाणा   – बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर (अनुसूचित जाती), खामगाव आणि जळगाव जामोद.
अकोला – विधानसभा मतदार संघ- आकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तीजापूर,   (अनुसूचित जाती) आणि रिसोड
अमरावती  – अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर.
वर्धा – विधानसभा मतदार संघ-  अमरावती, तिवसा, दर्यापूर (अनुसूचित जाती), बडनेरा, मेळघाट (अनुसूचित) आणि अचलपूर.
रामटेक  -विधानसभा मतदार संघ (अनुसूचित जाती) – काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड (अनु.जाती), कामठी आणि रामटेक
नागपूर – दक्षिण-पश्चिम, दक्षिण नागपूर, उत्तर नागपूर, पूर्व नागपूर, मध्य नागपूर, पश्चिम नागपूर.
भंडारा-   तुमसर, भंडारा (अनु.जाती), साकोली, अर्जुनी मोरगाव (अनु.जाती), तिरोडा आणि गोंदिया.
गडचिरोली – चिमूर, आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी (अनु.जमाती) आणि ब्रम्हपुरी.
चंद्रपूर –  राजुरा, चंद्रपूर (अनु.जाती), बल्लारपूर, वरोरा, यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी आणि आर्णी (अनु. जमाती).
यवतमाळ / वाशीम – वाशीम, (अनु जाती), कारंजा, राळेगाव, (अनु.जमाती), यवतमाळ, दिग्रस आणि पुसद.