दीड महिन्यापासून आपल्या उमेदवारासाठी जिवाचे रान केलेल्या सक्रिय कार्यकर्त्यांनी आता दोन दिवस स्वत:साठी काढण्याचे ठरविले असून गुरुवारी मतदान झाल्यानंतर शुक्रवारपासून तीन दिवस थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर, माथेरान, समुद्रात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गोवा, अलिबाग गाठून फूल टू धम्माल करण्याचे निश्चित केले आहे. टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडे या ठिकाणासांठी मोठय़ा प्रमाणात ग्रुप बुकिंग झालेले आहे. काही श्रीमंत कार्यकर्त्यांनी थायलंड, सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस येथे उड्डाण करण्याचे ठरविले आहे. मुंबई, ठाण्यातील १९ लोकसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान होत आहे. गेली दीड महिना या मतदारसंघातील कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरत होते. त्यामुळे गुरुवारी मतदान होऊन मतपेटय़ा रवाना झाल्यानंतर हे कार्यकर्ते सुटकेचा नि:श्वास टाकणार आहेत. सहलीचा बेत पूर्णत्वास नेण्यास याच भागातील कार्यकर्ते आघाडीवर असल्याचे दिसून येते. त्यामुळे निवडणुकाचा रणसंग्राम संपल्यानंतर लागलीच अनेक जणांनी महाबळेश्वर, माथेरान, गोवा आणि अलिबागला जाण्याचे बेत आखले आहेत. सहलीचा हा खर्च उमेदवार करणार असून अनेक उमेदवारांनी आपल्या खास कार्यकर्त्यांसाठी ग्रुप बुकिंग केले असल्याचे विजय टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचे श्रीकांत ऊर्फ बबलू पवार यांनी सांगितले. सहलीची ही ठिकाणे राज्यात असल्याने तेथे जाण्याचा प्रवास हा ट्रॅव्हल्स गाडय़ांनीच केला जाणार असून त्यासाठी युनोव्हा आणि तवेरा गाडय़ांना पसंती देण्यात आली आहे. मुंबई-ठाण्यातील कार्यकर्ते हे मनमौजी म्हणून ओळखले जात असून उमेदवारांकडून निवडणुकीच्या काळात कामासाठी पैसे घेण्याऐवजी काही जणांनी असे पॅकेज घेतले आहे. पॅकेजची ही मागणी पूर्ण करण्यात अपक्ष उमेदवारदेखील आघाडीवर असून त्यांनीही जवळच्या माथेरान व लोणावळा येथील आरक्षण आपल्या कार्यकर्त्यांना करून दिले आहे. यात मद्याचा पुरवठा येथून करण्यात आला आहे. त्यामुळे मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ह्य़ा स्वाऱ्या पिकनिक स्पॉटकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात सर्वसाधारपणे चांगल्या प्रकारे आरक्षण असणाऱ्या या सहलीच्या ठिकाणी या वर्षी आरक्षण वाढले असल्याचे महाबळेश्वर येथील संजय रांजणे यांनी सांगितले. काही श्रीमंत उमेदवारांनी आपल्या खास कार्यकर्त्यांना थायलंड (बँकॉक) सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस यांची पॅकेज दिलेली आहेत. यात काही जणांना गावी जाण्याचा खर्च उचलण्यात आला आहे. त्यामुळे १६ मे पर्यंत अनेक प्रमुख कार्यकर्ते परागंदा झाल्याचे दिसून येणार आहे.